मोदी सरकारच्या तीन वर्षांतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सरकारच्या कामगिरीवर टीका केली. पुण्यातील कार्यक्रमात ते बोलत होते.

आघाडी सरकारच्या काळातील आमच्या योजनाच सरकार राबवत असून पॅकेजिंग आणि ब्रॅण्डींगमध्ये मोदी कुशल आहेत, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. देशात शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे सांगताना भारतीय जनता पक्ष म्हणजे भारतीय जुमला पार्टी झालाय, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, देशातील जनतेने विश्वासाने भाजपच्या हाती सत्ता दिली. मात्र, गेल्या तीन वर्षांत सरकारने सर्वसामान्याच्या हिताची एकही योजना राबवली नाही. यावेळी त्यांनी मागील वर्षीच्या नोटाबंदीच्या मुद्याला हात घालत मोदी सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले. मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय घेताना कोणत्याही नेत्याला किंवा तज्ज्ञ व्यक्तीचा त्यांनी सल्ला घेतला नाही. त्यांचा हा निर्णय देशासाठी विनाशकारी ठरला असून यातून बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागणार असल्याचे ते म्हणाले. सरकारचा कारभार हा एकनायकी व एकाधिकारशाहीचा असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी मोदींनी दिलेल्या आश्वासनावर काही प्रश्न देखील उपस्थित केले. दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देणाऱ्या पंतप्रधानांच्या राज्यात तरुण बेरोजगार का आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना अच्छे दिन आणणार अशी घोषणा मोदींनी केली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीला शेतकऱ्यांकडून ६० लाख टन कमी गहू खरेदी केले जात आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्याचे विरोधक आहे, असे ते म्हणाले.

तीन वर्षांच्या पूर्तीनिमित्त नरेंद्र मोदींची नवी घोषणा पाहिली का?