आपल्या घरात तयार होणारा ओला आणि सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयोग घरातच सुरू केला तर ओल्या कचऱ्यापासून उत्तम खत तयार होऊ शकते हे पिंपळे सौदागर आणि परिसरातील पाचशे कुटुंबांनी सिद्ध करून दाखवले आहे.

पिंपळे सौदागरमधील सहा-सात तरुणांनी दीड वर्षांपूर्वी घरात तयार होणारा ओला व सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याच्या प्रयोगाला सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचा प्रचार हळूहळू परिसरात झाला आणि या उपक्रमातील सहभागी कुटुंबांची संख्या वाढत गेली. या प्रयोगाची माहिती घेत नागरिकांनी घरचा ओला कचरा घरीच कुजवून त्याचे खत तयार करण्यास सुरुवात केली. सहभागी झालेल्या आणि नव्याने होणाऱ्या सर्वाचे तीन व्हॉट्स अ‍ॅप गट तयार करण्यात आले आहेत. या गटांवर खत तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत हे सात जण सर्वाना मार्गदर्शन करतात.

कचऱ्याच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पिंपळे सौदागरमधील सिद्धार्थ नाईक आणि त्यांच्या मित्रांनी दीड वर्षांपूर्वी हा प्रयोग सुरू केला. घरचा ओला व सुका कचरा वेगळा करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यास सुरुवात करण्यात आली. घरच्या घरी तयार होणारे खत ही मंडळी त्यांच्याच घरातील कुंडय़ांसाठी किंवा टेरेस गार्डनसाठी वापरतात. किंवा ते ज्या ठिकाणी राहतात त्या गृहनिर्माण संस्थेच्या बागेला खत दिले जाते. सिद्धार्थ नाईक, अभिजित देशमुख, राहुल भागवत, आनंद सीतारामन, श्रीहरी सुथ्थामलय, चेतन कापे आणि सुधीर शिंदे या सात जणांनी हा प्रयोग आधी करून बघितला. तो यशस्वी झाल्यानंतर पिंपळे सौदागरमधील काही गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांची त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला तीस ते चाळीस नागरिक उपस्थित होते. त्यांना या प्रयोगाची माहिती देण्यात आली आणि त्यांना कचऱ्यापासून खतनिर्मिती कशी करतात, त्याचा फायदा काय याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर ओला व सुका कचरा वेगळा करून त्यापासून खत निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

बैठकीला जमलेल्या रहिवाशांनी होकार दिल्यानंतर सर्वाचा सहभाग होईल अशा पद्धतीने सर्वाचे व्हॉट्स अ‍ॅप गट तयार करण्यात आले. या सात जणांमधील कोणी ना कोणी नागरिकांना मार्गदर्शन करतात. उपक्रमात सहभागी झालेल्या चाळीस जणांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना तसेच सोसायटीमधील इतर नागरिकांना उपक्रमाची माहिती दिली. मार्गदर्शनही केले. त्यामुळे या उपक्रमाची माहिती अनेकांपर्यंत पोहोचली. त्यातून अनेक जण तयार झाले. सध्या विविध गृहनिर्माण संस्थांमधील पाचशे कुटुंब ओला व सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करतात. त्यासाठी तयार करण्यात आलेले कल्चर सर्वाना दिले जाते. त्याचा दर चार दिवसांनी वापर करून हे खत तयार केले जाते. घरच्या घरी खत तयार करण्यासाठी आवश्यक असलेली प्लास्टिकची बादली खरेदी करून हा प्रयोग करता येतो किंवा बाजारामध्ये त्यासाठीचा तयार संचही विकत मिळतो. तयार संचाची किंमत दीड हजारांपासून तीन हजारापर्यंत आहे. पुढच्या महिन्यात इतर भागांतील गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांचे मेळावे घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सिद्धार्थ नाईक यांनी सांगितले.