पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगार, त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक याबाबतची माहिती आता ‘गुगल मॅप’वर संकलित करण्यात आली आहे. बऱ्याचदा गुन्हेगारांकडून देण्यात आलेले पत्ते चुकीचे असतात. किंवा हे पत्ते किंवा अतिशय दाट वस्तीच्या भागातील असतात. अशावेळी ही घरे शोधण्यास पोलिसांना अडचणी येतात. त्यामुळे शहरातील ३९ पोलीस ठाण्यांतील गुन्हेगारांची माहिती ‘गुगल मॅप’वर संकलित करण्याचे काम येरवडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी हाती घेतले आहे. हे काम जवळपास पूर्ण झाले असून स्वातंत्र्यदिनाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारपासून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमधील गुन्हेगारांची माहिती ‘गुगल मॅप’वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगार वास्तव्यास असतात. ज्या गुन्हेगारांवर एकपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. अशांना कायद्याच्या भाषेत सराईत किंवा ‘हिस्ट्री शिटर’ असे म्हटले जाते. सराईतांवर नजर ठेवण्याचे काम पोलीस ठाण्यांमधील  प्रत्येक पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर (सव्‍‌र्हेलन्स) सोपविण्यात आलेले असते. त्यांच्यावर दररोज गुन्हेगारांच्या हालचाली कळविण्याचे काम सोपविण्यात आलेले असते. मात्र, बऱ्याचदा गुन्हेगारांकडून देण्यात आलेले पत्ते चुकीचे असतात किंवा ते घर बदलतात. पोलीस ठाण्यात नव्याने नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांना गुन्हेगारांचे घर शोधताना अडचण येते. त्यामुळे गुन्हेगारांची इत्थंभूत माहिती संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंड, चोरटय़ांची माहिती संबंधित पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेकडे उपलब्ध असते. गंभीर गुन्हा घडल्यानंतर सराईतांची माहिती घेऊन तपास सुरू केला जातो. पोलीस ठाण्यात नव्याने आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना हद्दीतील गुन्हेगारांची माहिती घेण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीला येरवडा भागातील गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. गुन्हेगाराचे संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, नातेवाईक याबाबतची माहिती संकलित करून ती ‘गुगल मॅप’वर टाकण्यात आली आहे. परिमंडल दोनचे तत्कालिन पोलीस आयुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी उत्तर विभागातील गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या. उत्तर विभागातील ३६२ गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी संकलित केलेल्या माहितीचे अवलोकन केले असता त्यांनी दक्षिण विभागातील गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचा सूचना दिल्या. अशा प्रकारे ६५७ गुन्हेगारांची माहिती ‘गुगल मॅप’वर टाकण्यात आली. शहरातील ३९ पोलीस ठाण्यांमधील चोरटे, गुन्हेगारांची माहिती पोलिसांना एका ‘क्लिक’वर उपलब्ध झाली आहे. याकामी अभियांत्रिकी शाखेत शिकणारा माझा मुलगा दिपेन आणि पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आहे, असे पोलीस निरीक्षक कदम यांनी सांगितले.

‘गुगल मॅप’वरील शहरातील गुन्हेगारांची संख्या

३६२

उत्तर विभाग-

२९५

दक्षिण विभाग