डेंग्यूच्या रुग्णांमध्येही चिकुनगुनियासारखे सांधेदुखीचे लक्षण दिसण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञ नोंदवत आहेत. तसेच, काही डेंग्यूरुग्णांमध्ये यकृताला सूज येते. त्याचेही प्रमाण यंदा वाढले आहे. गेल्या दोनच दिवसांत पालिकेकडे तब्बल ७७ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली आहे.
या वर्षी जूनपासूनच शहरातील डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली होती. पालिकेकडे होणाऱ्या रुग्णांच्या नोंदीनुसार जूनमध्ये १४० डेंग्यूसदृश रुग्ण सापडले होते, तर जुलैमध्ये २९५ रुग्ण सापडले होते. चालू महिन्यात आतापर्यत ३४२ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातही या आठवडय़ात सोमवारी ३५ व मंगळवारी एकाच दिवसांत ४२ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत.
डेंग्यूच्या लक्षणांमध्ये ‘अथ्रायटिस’ म्हणजे सांधेदुखीचे लक्षणही वाढल्याचे दिसत असल्याचे संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. महेश लाखे यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘पूर्वी ५ ते १० टक्के डेंग्यूरुग्णांमध्ये सांधेदुखी दिसायची, पण माझ्या पाहण्यात या वर्षी डेंग्यूच्या ४० टक्के रुग्णांमध्ये सांधेदुखी दिसून येत आहे. यात हातापायाचे लहान सांधे, मनगट, गुडघे यात काही प्रमाणात सूज येते व ते दुखतात. याच प्रकारचे लक्षण चिकुनगुनियातही दिसते व त्यामुळे रोगनिदानात समस्या येतात. रुग्णांना आजाराच्या पहिल्या ३-४ दिवसांत १०३-१०४ च्या आसपास असा तीव्र ताप येतो. अंगावर पुरळ येण्याचे लक्षण यंदा तुलनेने कमी दिसते आहे. त्याऐवजी हाडे दुखणे, अंगदुखी, पाठदुखी व डोकेदुखीबरोबरच घसादुखी व सांधेदुखी ही लक्षणे डेंग्यूसदृश रुग्णांमध्येही दिसत आहेत. अशा रुग्णांच्या डेंग्यू व चिकुनगुनिया अशा दोन्ही चाचण्या केल्या जातात व त्यातील अनेकांमध्ये डेंग्यूची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ येते.’’
काही रुग्णांमध्ये आजाराच्या सुरूवातीला डेंग्यूची चाचणी ‘निगेटिव्ह’ येऊन नंतर ४-५ दिवसांनी पुन्हा चाचणी केल्यास ‘पॉझिटिव्ह’ येते, असेही ते म्हणाले.

डेंग्यूची लक्षणे
’ तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, शरीरातील पाणी खूप कमी होणे ही लक्षणे ४ ते ५ दिवस दिसू शकतात.
’ ताप उतरू लागल्यावर व अंगदुखी कमी होऊन रुग्णाच्या रक्तातील ‘प्लेटलेट काऊंट’ कमी होऊ लागतो. याच वेळी अंगावर पुरळ येणे व यकृताला सूज येण्यासारखे लक्षण दिसू शकते.
’ डेंग्यूत होणारी सांधेदुखी मात्र ताप गेल्यानंतरही ७ ते १० दिवस राहात असल्याचे दिसत आहे.

काही डेंग्यू रुग्णांमध्ये यकृतावर परिणाम झाल्याचे दिसते व तशा रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. डेंग्यू दुसऱ्यांदा झाला असेल (सेकंडरी डेंग्यू) तर प्लेटलेट अधिक कमी होऊ शकतात. पण आता पहिल्यांदा (प्रायमरी) डेंग्यू झाला असतानाही प्लेटलेट खूप कमी झाल्याचे दिसते आहे. ‘सेकंडरी’ डेंग्यूतील गुंतागुंती ‘प्रायमरी’ डेंग्यूतही दिसू लागल्या असल्याचे माझे निरीक्षण आहे. अर्थात डेंग्यूत गुंतागुंत होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण १ टक्क्य़ाहून कमी असते.
– डॉ. भारत पुरंदरे, संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ