पुण्यामध्ये वास्तव्यास असलेल्या संदीप सिन्हा यांनी एकाच कॅनव्हासवर तब्बल ९४५ लघुचित्रे (मिनिएचर पेंटिंग्ज) चितारली आहेत. त्यांनी १४ इंच बाय ११ इंच आकाराच्या कॅनव्हासवर ‘जीवन आणि जागतिक तापमानवाढ’ विषयावर आधारित एक सेंटिमीटर बाय एक सेंटिमीटर आकाराची तब्बल ९४५ चित्रे काढली आहेत.

या असाधारण आणि वैशिष्टय़पूर्ण कलाकृतीमुळे संदीप सिन्हा यांना भरघोस प्रसिद्धी आणि प्रशंसा लाभली आहे. त्यांच्या नावाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘वर्ल्ड रेकॉर्ड सेटर’, ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.

या कलाकृतीबद्दलची संकल्पना स्पष्ट करताना संदीप सिन्हा म्हणाले,‘ मला काहीतरी अद्वितीय निर्मिती करून दाखवायची होती. अशी कलाकृती साकारायची होती, जी माझ्या देशाला जागतिक गौरव मिळवून देईल. त्या हेतूनचे मी ही चित्रशैली निवडली.’

माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक असलेले संदीप सिन्हा मूळचे मध्य प्रदेशातील जबलपूरचे असून सध्या पुण्यातील टेक मिहद्र कंपनीत काम करतात. चित्र रंगवण्यात त्यांना अपार आनंद मिळतो. या कलेचा वापर तणाव व्यवस्थापनाचे माध्यम म्हणून करतात. ते आपल्या बहुतेक कलाकृती कल्पनेतून साकारतात आणि त्यासाठी अ‍ॅक्रिलिक रंगांचा वापर करतात. संदीप एक वर्षभर अमेरिकेत असताना त्यांना एक महिना काम नव्हते. त्याचवेळी त्यांनी ‘मिनिएचर पेंटिंग्ज’ या वैशिष्टय़पूर्ण कलेचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. या चित्रांवर त्यांनी दिवसाला आठ तास काम करुन संपूर्ण कलाकृती केवळ २२ दिवसांत साकारली आहे.

संदीप सिन्हा म्हणाले, ‘जग बघण्याचा सर्वोत्तम मार्ग हा डोळे मिटल्यानंतर दिसतो. मला बाह्य़ जगातील काहीही प्रेरणा देत नाही. मी माझ्याच अंतरंगात प्रवेश करतो तेव्हाच त्या प्रेरणेचा आविष्कार होतो. एखादी कलाकृती रेखाटतो तेव्हा ती माझ्या भावनांच्या आधारे असते. चित्र रंगवणे हे एक प्रकारे ध्यानधारणेसारखेच आहे. हे रंगच मला सुखद अनुभूती आणि शांतता मिळवून देतात. अगदी छोटी कलाकृतीही माझ्या भावना, माझा आत्मा आणि माझी स्वप्ने यातील दुवा असते.’