नवे शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच. सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या पुण्यातील महाविद्यालये आणि वसतिगृहांना पाण्याच्या तुटवडय़ाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, पुण्यातील वाडिया महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांसारख्या काही महाविद्यालयांनी पावसाच्या पाण्याचा उपयोग करून घेत आणि पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याच्या तुटवडय़ावर उत्तर शोधले आहे.
पुण्यातील वाडिया अभियांत्रिकी महाविद्यालयात पर्जन्य संधारणाचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या दोन्ही महाविद्यालयांच्या आवारात अनेक मोठय़ा इमारती आहेत. या महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थ्यांचा रोजचा वावर असतो. वसतिगृहांमध्येही शेकडो विद्यार्थी राहतात. दिवसाला लाखो लिटर पाण्याचा वापर होत असतो. मात्र, पाण्याच्या टंचाईवर या महाविद्यालयांनी उपाय कृतीत आणले आहेत.
वाडिया महाविद्यालयामध्ये २००४ पासून पर्जन्य संधारणाचा प्रकल्प राबवण्यात येतो. गेल्या चार वर्षांमध्ये या महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आलेल्या इमारतींचे बांधकामही पावसाच्या पाण्यावरच करण्यात आले. महाविद्यालयामध्ये साधारण १५ हजार विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आहेत. मात्र, तरीही महाविद्यालयाला पाणीटंचाई जाणवलेली नाही. महाविद्यालयाच्या आवारातील इमारतींच्या गच्ची, छतावर साठलेले पाणी एकत्र करून महाविद्यालयाच्या आवारात तयार केलेल्या बोअरवेलमध्ये आणि एका विहिरीत सोडले जाते. इतकेच नाही, तर महाविद्यालयाच्या साधारण साडेतीन एकर एवढय़ा मैदानावर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचाही वापर केला जातो. मैदानावर साठलेले पाणी रिंगवेलमध्ये जमा केले जाते. फक्त पिण्याचे पाणी हे महानगरपालिकेकडून घेण्यात येते. बाकीच्या पाण्याची गरज ही पावसाच्या साठवलेल्या पाण्याच्या माध्यमातून पूर्ण होते, अशी माहिती वाडिया अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अभय हाके यांनी दिली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने पाण्याचा पुनर्वापराचा पर्याय स्वीकारला आहे. वसतिगृहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा वापर करण्यासाठी महाविद्यालयाने प्रकल्प हाती घेतला आहे. साधारण साठ हजार लिटर पाण्याचे शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प महाविद्यालयाने हाती घेतला आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये साधारण २ हजार विद्यार्थी राहतात. वसतिगृहामध्ये दिवसाला साधारण दीड लाख लिटर पाणी वापरले जाते. या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी महाविद्यालयाने प्रकल्प हाती घेतला आहे.