अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची माहिती

शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हमी भाव जाहीर केल्यानंतर, खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाल्याने व्यापारी नफा कमावत होते. यातून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केंद्रांवरील खरेदीसाठी ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक जोडणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न व पुरवठा आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान कार्यक्रमानंतर बापट पत्रकारांशी बोलत होते. विदर्भात आणि कोकणात धान्य खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. तूरडाळ आधीच खरेदी केली असून कपाशी खरेदी केंद्र सुरू होतील. राज्यात सिंचनाचे क्षेत्र वाढत असून, उत्पादनातही वाढ होत आहे. शासनाच्या धान्य खरेदी केंद्रांवर होणारी लबाडी कमी व्हावी. योग्य शेतकऱ्यांना हमी भावाचा लाभ मिळावा. व्यापाऱ्यांनी गरफायदा घेऊ नये, यासाठी केंद्रांवर धान्य खरेदी करताना ऑनलाईन पद्धतीने आधारकार्ड जोडणी करण्यात येणार आहे.

खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी धान्य आणल्यानंतर पावती देताना त्यावर आधार क्रमांक अंगठय़ाच्या ठशासह नोंदणी केली जाईल. शेतकऱ्याने शेतमालाची पेरणी केल्यानंतर त्याची सातबाराच्या उताऱ्यावर खातेनिहाय नोंद होते. त्यामुळे खरेदी करताना या नोंदीचा विचार केला जाईल. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा अधिक माल आणला तर पकडता येणे शक्य होणार आहे.

भाव कमी असताना शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन खरेदी करायची, शेतकऱ्याचा सातबारा घेऊन ठेवायचा आणि त्याचा गरवापर करून सरकारी केंद्रांवर माल विकायचा, असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अशा प्रकारांना आता आळा बसणार असून व्यापाऱ्यांनी कमी भावात घेतलेला माल केंद्रांवर जास्त भावात विकण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही

बापट यांनी दिला. व्यापारी शेतकरी असल्यास माल घेऊ, तसेच संबंधित शेतकऱ्याने इतर जणांचा माल गोळा करून आणल्यास तो स्वीकारला जाणार नाही, असेही बापट यांनी स्पष्ट केले.