दिवाळीत आगी लागण्याच्या दरवर्षी किमान शंभर घटना

गेल्या काही वर्षांपासून दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे. शहर आणि परिसरात दिवाळी सुरू झाल्यापासून तुळशीच्या लग्नापर्यंत फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या दरवर्षी किमान शंभर घटना घडतात. या दुर्घटना फटाके उडवताना, फोडताना नागरिकांच्या अतिउत्साहामुळे, हलगर्जीपणामुळे तसेच कायद्याचे योग्य पालन न केल्याने होत असल्याचे समोर आले आहे.

फटाके उडवताना घेण्याच्या काळजीबाबत वेळोवेळी आवाहने केली जात असली, तरी योग्यप्रकारे काळजी घेत जात नसल्यामुळेच आगीच्या घटना घडतात. मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांवर बंदी आहे. तसेच ध्वनिप्रदूषण रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत फटाके उडविण्यास बंदी आहे. मात्र त्याचेही पालन होत नाही. रहदारीचे मोठे रस्ते, वस्त्यांचे अरुंद भाग, रुग्णालये, शाळा, शांतता क्षेत्र आदी भागात फटाके न वाजविता ते मोकळ्या जागेत फोडावेत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी त्याकडेही दुर्लक्ष होते.

अलीकडील काळात फटाके कोणत्या कारणासाठी फोडावेत, त्याचे प्रमाण किती, कोणते असावे, आवाजांची मर्यादा किती असावी, फटाके उडवताना कोणती काळजी घ्यावी याबाबत तसेच कायद्याने बंधनकारक असलेल्या गोष्टींकडेही कानाडोळा केला जातो.

फटाकेविक्री दुकानांचा प्रवास

पुण्यात काँग्रेस भवनासमोरच्या रस्त्यावर दिवाळी दरम्यान फटाक्यांची विक्री होत असे. एका वर्षी त्या दुकानांना आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर सारसबागेजवळील सणस मैदानात फटाके विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली. त्या मैदानाचे नूतनीकरण झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून नदीपात्रातील डीपी रस्त्यावर फटाका स्टॉलना परवानगी देण्यात येत होती. मात्र तेथेही स्थानिक नागरिकांचा विरोध झाल्याने फटाका विक्रेत्यांनी यंदा वडगाव शेरी येथील खासगी जागेत स्टॉल लावले आहेत.

दिवाळीतील चार दिवस अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व केंद्रांच्या गाडय़ा, पाण्याचे टँकर सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. घरात फटाके साठवून ठेवू नयेत, असेही आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.

– प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका