स्मार्टफोनच्या युगात समाजातील माणुसकी हरवल्याचा धक्कादायक प्रकार भोसरीत पाहायला मिळाला. पिंपरी-भोसरी एमआयडीसी परिसरातील इंद्रायणीनगरमध्ये बुधवारी एका संगणक अभियंत्याला अपघात झाला. सतीश मेटे असे या तरुणाचे नाव होते. ज्या गाडीने त्याला उडवले तो पसार झाला. गंभीर जखमी झालेला सतीश रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी त्याच्या मदतीला कोणीही समोर आले नाही. तरुणाला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. कळस म्हणजे या तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ चित्रिकरण करण्यामध्ये नागरिक व्यस्त झाल्याचे पाहायला मिळाले. हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असाच होता. अपघातानंतर या तरुणाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असते, तर त्याचा जीव कदाचित वाचला असता. पण समाजात बघ्यांची भूमिकेतील कोणाच्याही मनात असा विचार आला नाही.

भोसरीतील इंद्रायणीनगर चौकात सतीश हा मित्रासोबत चहा घेण्यासाठी आला होता. चहा घेऊन परतत असताना एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात तो गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडला. बघ्यांची गर्दी फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न असताना सतीशची अवस्था गंभीर असल्याचे एका डॉक्टरच्याच लक्षात आले. त्यावेळी तेथून जात असणारे डॉ. काटे गर्दी पाहून अपघाताच्या ठिकाणी आले. त्यांनी रिक्षा बोलवून सतीशला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत फारच उशीर झाला होता. रुग्णालयात त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.