स्फोटांपेक्षा अफवा धोकादायक आहेत. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर सोशल मीडियाचा वापर जपून झाला पाहिजे, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल यांनी पिंपरीत केले. धार्मिक स्थळांमध्ये भेटवस्तू देणाऱ्यांची नोंद ठेवावी, पूजेचे साहित्य तपासून घ्यावे तसेच परिसरात बेवारस वाहने असल्यास पोलिसांना कळवावे, अशा सूचनाही मुत्याल यांनी यावेळी दिल्या.
पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील धार्मिक स्थळे, मॉल व वाहनतळांच्या प्रमुखांची बैठक आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने, सहायक पोलीस आयुक्त रमेश भुरेवार, नगरसेविका सुजाता पालांडे, नीता पाडाळे, मायला खत्री आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. बैठकीनंतर मुत्याल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या सणांचे दिवस आहेत. पुण्यातील स्फोटाच्या घटनेनंतर खबरदारी म्हणून धार्मिक स्थळांच्या प्रमुखांशी संवाद साधला. १९९२ ते २०१४ या कालावधीत झालेल्या स्फोटांच्या घटनांचे उपस्थितांसमोर सादरीकरण करण्यात आले. त्या स्फोटातील छायाचित्रे, मृत व जखमींची आकडेवारी, बॉम्बचे विविध प्रकार, कशाप्रकारे खबरदारी घ्यावी आदींची माहिती देण्यात आली. अतिरेक्यांना जात-धर्म नसतो. स्फोटांमध्ये सगळ्याच जाती, धर्माची माणसे मारली जातात. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी सर्वानी दक्षता घेतली पाहिजे. धार्मिक स्थळांमध्ये सुरक्षा समित्या नेमून कामकाज वाटून घ्यावे, भेटवस्तू देणाऱ्यांची नोंद ठेवावी, पूजेचे साहित्य तपासून घ्यावे, सीसीटीव्ही लावून घ्यावेत, बेवारस वाहनांची माहिती पोलिसांना कळवावी आदी सूचना देण्यात आल्या. सोशल मीडियाचा वापर जपून करावा. कोणतीही माहिती पुढे पाठवताना त्याची खात्री करून घ्यावी. संशयास्पद व चुकीची माहिती वाटल्यास ती नष्ट करावी. मात्र, पुढे पाठवू नये, असे आवाहन मुत्याल यांनी केले.