खंडोबाच्या जेजुरीनगरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यातही भेसळ होत असल्याचे उघडकीस आले असून, त्यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या बनावट भंडाऱ्याच्या (हळद) विक्रीवर बंदी घालण्याची मागणी भाविक व ग्रामस्थ मंडळाने केली आहे.
जेजुरीच्या खंडोबाला भंडारा म्हणून शुध्द हळकुंडाचे चूर्ण, तसेच खोबरे वाहिले जाते. येथे वर्षांकाठी सात मोठय़ा यात्रा भरतात. सोमवती अमावस्या यात्रेला तर शेकडो पोती भंडाऱ्याची उधळण होते. येथे पूर्वीपासून देवाला वाहण्यासाठी कापडी पिशवीत भंडारा (हळद) व खोबरे एकत्र देण्याची प्रथा आहे. गेल्या चार-पाच वर्षांत बनावट हळदीच्या विक्रीने येथे जोर धरला आहे. काही मोजके व्यापारी सोडल्यास अनेक व्यापारी जादा नफा मिळवण्याच्या हेतूने बनावट हळदीची विक्री करतात. प्रसाद म्हणून खोबऱ्याबरोबर हा अपायकारक भंडारा भाविकांच्या पोटात जातो. त्यामुळे मळमळणे, पोट दुखणे, जुलाब-उलटय़ा आदी त्रास उद्भवतात. तसेच, उधळलेला बनावट भंडारा अंगावर पडल्याने अंगाला खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांची जळजळ असा त्रास होतो. वयोवृद्ध, लहान मुले, रुग्ण यांच्यावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. जेजुरीतील काही ग्रामस्थ व इतर भाविकांना दररोज देवाचा भंडारा कपाळी लावल्याने काळे डाग पडले आहेत. याबाबत खंडोबा देवस्थान व ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यांची शासनाने गंभीरपणे दखल घेतलेली नाही.
अन्न व औषध भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या पदार्थाची विक्री थेट हळद म्हणून होत नसल्याने आम्ही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. हा प्रकार सौंदर्य प्रसाधने विभागात मोडतो, त्यामुळे याकडे कोणीही गांभीर्याने पाहात नाही. बनावट हळदीची विक्री करण्यास तातडीने बंदी घालावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शासन काही करत नसल्याने जेजुरीत होलसेल व्यापारी बनावट भंडाऱ्याचे ट्रकच्या ट्रक खाली करीत आहेत.
 
भंडाऱ्यात भेसळ करण्यासाठी मका, चिंचुका, खराब तांदूळ यांचे पीठ, विटांची भुकटी, स्टार्च पावडर व रंगविलेल्या लाकडाचा भुसा यांचा वापर केला जातो. त्याला पिवळा रंग आणण्यासाठी मेटॅलिन यलो रंग व विविध रसायने वापरली जातात. खंडोबाला येणारे भाविक भोळेपणाने हा भंडारा खरेदी करतात. हाच भंडारा कपाळी लावून उरलेला प्रसाद म्हणून घरी नेतात. शिल्लक राहिलेल्या भंडाऱ्याचा उपयोग अनेक कुटुंबे घरी स्वयंपाकात करतात.तर काही जण हा भंडारा दुधात व पाण्यात घालून पितातही.

शुद्ध हळकुंडाची हळद ही आरोग्यास चांगली असते.परंतु बनावट हळदीमध्ये असण्याऱ्या रसायनांमुळे नाजूक त्वचेवर अनिष्ट परिणाम होतात.असे त्वचा रोग बरे होण्यास खूप कालावधी लागतो. त्यामुळे शक्यतो बनावट हळद लावण्य़ाचे भाविकांनी टाळावे.
– डॉ.निनाद खळदकर (त्वचा रोग तज्ज्ञ)

बनावट भंडाऱ्याची विक्री हा विषय गंभीर असून याबाबत व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतिच्या भंडाऱ्य़ाची विक्री करावी, याबाबत अन्न व औषध भेसळ प्रशासनाकडे खंडोबा देवस्थान रीतसर तक्रार करणार आहे.
– सुधीर गोडसे (प्रमुख विश्वस्त खंडोबा देवस्थान,जेजुरी)