वसुंधरा दिनाचे औचित्य साधत महापालिकेतर्फे नदी स्वच्छता अभियान सुरू करण्यात आल्यानंतर पर्यावरणप्रेमी पुणेकरांनीही त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. मात्र, नदी सुधारणेसाठी गेली सात वर्षे जो सुमारे चारशे कोटींचा खर्च झाला, त्याचे काय असा प्रश्न या अभियानामुळे उपस्थित झाला आहे. नदी सुधारणेतील अनेक कामांवर फक्त खर्च झाला असून त्यातून काहीही साध्य झालेले नाही, हेही वास्तव या निमित्ताने पुढे आले आहे.
पुण्यातून वाहणाऱ्या मुठा नदीचे रूप अत्यंत केविलवाणे झाले असून त्यातून पावसाळा वगळता अन्य सर्व काळ फक्त गटाराचेच पाणी वाहत असते. नदी मोठय़ा प्रमाणावर प्रदूषित झाल्यामुळे महापालिकेने केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या जवाहरलाल नेहरू योजनेच्या अनुदानात नदी सुधारणेचा प्रकल्प पाठवला होता. तो मंजूर झाल्यानंतर सन २००७ पासून आतापर्यंत सुमारे साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये या प्रकल्पासाठी महापालिकेला मिळाले आहेत. मात्र, नदी सुधारणेसंबंधीची कोणतीही परिणामकारक कामे नदीपात्रात व काठाने झालेली नाहीत. डॉ. नितीन करीर महापालिका आयुक्त असताना त्यांनी नदी सुधारणेसाठी विविध स्तरावर प्रयत्न केले. त्यानंतर आता अतिरिक्त आयुक्त म्हणून नव्याने रुजू झालेले ओमप्रकाश बोकारिया यांनी नदी स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. मात्र, नदी सुधारणा व स्वच्छता यासाठी वेळोवेळी मोठे खर्च, उपक्रम आणि अभियाने झाली, तरीही नदीचे रूप कोणत्याही टप्प्यात पालटलेले नाही.
वारजे, राजाराम पूल ते संगम पूल आणि संगम पूल ते मुंढवा पूल, खराडी असे सामान्यपणे नदीचे दोन टप्पे केले जातात. या टप्प्यांमध्ये नदी सुधारणा योजनेअंतर्गत नदीत चॅनलायझेशन करणे, नदीतील प्रदूषणास प्रतिबंध करण्याकरिता सांडपाणी वाहून नेण्यासाठी सोळाशे मिलिमीटर व्यासाची वाहिनी टाकणे, नदीच्या संरक्षणाकरिता कडेने भिंत बांधणे अशी कामे गेली अनेक वर्षे प्रस्तावित करण्यात येत आहेत. त्यावर खर्च होत आहे. महापालिकेच्या चालू वर्षीच्या अंदाजपत्रकातील आयुक्तांच्या भाषणातही हेच मुद्दे आहेत व ही कामे सुरू असून गेल्या वर्षी या कामांवर ब्याऐंशी कोटी रुपये खर्च झाले आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले आहे. या कामांमुळे नदीची वहनक्षमता वाढून पूरपरिस्थिती नियंत्रणात येईल तसेच नदीचे प्रदूषण थांबून नदीपरिसरात पर्यावरणपूरक परिस्थिती तयार होईल, असेही महापालिकेतर्फे वारंवार सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र नदीसंबंधीचा असा अनुभव पुणेकरांना नाही.
 

काय काय करणार होते..
– नदीचे काठ गॅबियन पद्धतीने संरक्षित करणे
– नदीचे प्रदूषण थांबवणे
– नदीत राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई
– पर्यावरण व जैववैविध्याला पूरक वातावरण करणे

 काय झाले..
– नदी सुधारणा कामे गेली सात वर्षे सुरू
– सर्व कामांवर फार मोठा खर्च
– नदीपात्रात अतिक्रमणे, राडारोडा
– नदीपात्रात सांडपाणी