राज्य सरकारने लागू केलेल्या हेल्मेट सक्तीच्या विरोधात महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्याजवळ शनिवारी (६ फेब्रुवारी) सकाळी साडेदहा वाजता महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे.
रावते यांच्या आदेशानंतर शहरात वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई सुरू केली. गुरुवारी एका दिवसात ४ हजार ४१७ वाहनचालकांवर कारवाई करून ४ लाख ७६ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. त्या पाश्र्वभूमीवर हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका रूपाली पाटील, माजी महापौर शांतिलाल सुरतवाला यांच्यासह शिवा मंत्री, बाळासाहेब रुणवाल आणि पतितपावन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अपघातामध्ये नागरिकांचा जीव वाचावा यासाठी हेल्मेट सक्ती केली जात आहे. मग, दारू आणि सिगारेट या व्यसनांमुळे मृत्यू होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण अधिक असताना सरकार यावर बंदी घालणार आहे का, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. कायदे नागरिकांसाठी आहेत. कायद्यासाठी नागरिक नाहीत. त्यामुळे पुणेकरांना हेल्मेट सक्ती मान्य नाही हे सरकारने ध्यानात घ्यावे, असेही मत व्यक्त करण्यात आले.
अंकुश काकडे म्हणाले, महामार्गावर हेल्मेट सक्ती करावी. मात्र, शहरांतर्गत रस्ते छोटे आहेत. वाहतुकीचा वेग देखील कमी असल्याने अशा ठिकाणी हेल्मेट सक्ती योग्य नाही. चारचाकीतून फिरणाऱ्यांनी दुचाकीस्वारांवर ही हेल्मेट सक्ती लादली असल्याचे खर्डेकर यांनी सांगितले. हेल्मेटमुळे आजूबाजूचे दिसत नाही, ऐकू कमी येते, मणक्याचे विकार होतात हे यापूर्वी हेल्मेट सक्ती झाली होती त्याच वेळी निदर्शनास आणून दिले होते, याकडेही लक्ष वेधण्यात आले.
शहरातील हेल्मेट सक्ती कायमची गाडण्याची गरज आहे, अशी भूमिका ग्राहक संरक्षण संस्थेने घेतली आहे. एकीकडे चेहरा दिसावा यासाठी चारचाकी वाहनांना काळ्या काचा नकोत, दुचाकीवरील मुलींना स्कार्फ नको अशी भूमिका घ्यायची तर दुसरीकडे हेल्मेट सक्ती करायची ही धोरणात विसंगती दिसते. हेल्मेटचा वापर चोरांसाठी अनुकूल ठरणार आहे, याकडे संस्थेचे अध्यक्ष सागर शिंदे यांनी लक्ष वेधले.