महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एम.एन.जी.एल.) कंपनीने पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी कोथरूडमधील ग्राहकांकडून तीन वर्षांपूर्वी आगाऊ रक्कम घेऊनही अद्याप गॅस पुरवठा सुरू केलेला नाही. ग्राहकांनी वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरेच दिली जात होती. अखेर पाइपलाइनद्वारे गॅस मिळण्यासाठी पैसे भरलेल्या ग्राहकांना आंदोलन करावे लागले आणि त्याची सुरुवात गुरुवारी चूल पेटवा आंदोलनाने करण्यात आली.
कोथरूडमध्ये विविध भागांमध्ये पाइपलाइनद्वारे गॅस देण्याची योजना होती. त्यासाठी प्रत्येक इमारतीत व सदनिकांमध्ये गॅसची पाइपलाइन आणि मीटर बसविण्यात आले आहेत. परंतु अंतर्गत पाइपलाइनची मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या लाइनशी जोडणी झालेली नाही. ही जोडणी झालेली नसल्यामुळे कोथरूडमधील शेकडो ग्राहकांना कंपनीकडून गॅस पुरवठा सुरू झालेला नाही. प्रत्यक्षात कंपनीने महापालिकेकडून रस्ते खोदाईची परवानगी घेऊन मगच ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घ्यायला हवी होती. परंतु तसे न करता अगोदर पैसे घेण्यात आले आहेत. या प्रकारात आमची फसवणूक झाली आहे, असा आरोप ग्राहकांनी केला असून कंपनीने त्वरित गॅस पुरवठा सुरू करावा, अशी ग्राहकांची मागणी आहे.
कंपनीने कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीतील मयूरेश अपार्टमेंटमधील नागरिकांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१३ दरम्यान प्रत्येकी पाच हजार पाचशे रुपये जमा केले होते. त्याबाबत कंपनीकडून रितसर पावत्या देखील देण्यात आल्या. परंतु त्यानंतर पुणे महापालिकेकडून रस्ता खोदाईकरिता परवानगी मिळत नसल्याचे कारण देत कंपनीने गेल्या अडीच वर्षांपासून आजपर्यंत गॅस पुरवठा करण्यास टाळाटाळ केली. ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असून गॅस पुरवठा सुरू झालेला नाही, अशी ग्राहकांची मुख्य तक्रार आहे. ग्राहक संरक्षण कक्षाचे संस्थापक अध्यक्ष सागर िशदे, तसेच मनीषा बोरसे, सुरेखा होले, सुभाष आमले, राजीव पाटील, राजेश गायकवाड, अर्चना भोसले, दिनेश भिलारे, पुष्पलता पाटील, जितेंद्र घोष, दुर्गा शुक्रे आदींची आंदोलनात प्रमुख उपस्थिती होती.

ग्राहकांची गेल्या अडीच वर्षांपासून फसवणूक होत असून त्यांना गॅसचा पुरवठा त्वरित झाला पाहिजे. अन्यथा न्यायालयात दावा दाखल केला जाईल. तसेच एमएनजीएलच्या ढिसाळ कारभाराबाबत आम्ही महापालिका आयुक्तांना निवेदन देणार आहोत. कंपनीने ग्राहकांना एका महिन्याच्या आत गॅस पुरवठा केला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
सागर शिंदे, अध्यक्ष, ग्राहक संरक्षण संस्था