फरीदाबाद येथे झालेले दलित हत्याकांड प्रकरण व त्यानंतर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री धुडगूस घातला. डिलक्स चौकातील मॉलमधील दुकाने व रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दलित हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे २५ ते ३० कार्यकर्ते डिलक्स चौकात जमा झाले होते. त्या वेळी पक्षाच्या पिंपरी विभागाचा पदाधिकारी सुरेश निकाळजे याच्या नेतृत्वाखाली निषेध सभाही घेण्यात आली. हा घटनेच्या निषेधार्थ व सिंग यांच्या वक्तव्याबाबत जोरदार घोषणाही देण्यात आल्या. मात्र, जमलेले कार्यकर्ते अचानक िहसक झाले. त्यांनी दगडफेक करून वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे चौकाच्या शेजारी असलेल्या एका मॉलवरही त्यांनी हल्लाबोल केला. मॉलमधील दुकानांची तोडफोड केली.
तोडफोडीमध्ये मॉलसह पीएमपीच्या एका बसचे व एका मोटारीचे नुकसान झाले. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोवर सर्व कार्यकर्ते पसार झाले होते. पोलिसांनी त्यांची माहिती काढून निकाळजे याच्यासह सहा जणांना अटक केली आहे. फरार झालेल्या इतर आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.