एकमेकांचा पाठलाग करणारी विमाने, उडणाऱ्या तबकडय़ा, रिमोटवर उडणारा पतंग, विमानांचे विविध प्रकार आणि त्यांनी सादर केलेल्या विविध चित्तथरारक प्रात्यक्षिकांतून विमानाचे विज्ञान लहान मुलांनी अनुभवले. विमानांचे पंख, त्यांची कार्य याची माहिती साध्या-सोप्या पद्धतीने समजावून घेत ‘एरोमोडेलिंग’ची नवी ओळखही लहानग्यांना झाली.

फटाके नको, विमाने उडवा या संकल्पनेवर आधारित एअर शोचे रोटरी हिलसाईडच्या वतीने रविवारी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते. विमानाच्या विज्ञानाची ओळख मुलांना व्हावी, हा यामागील हेतू होता. खऱ्या लढाऊ विमानांमुळे लूप, स्ट्रेट रोल, व्हर्टिकल रोल, नाईफ एज, स्पीन यांसारख्या थरारक कसरती करणाऱ्या रिमोटच्या लढाऊ विमानांचे शो अहमदनगर येथील एरोडमोडेलर्सचे संघ, पुण्यातील हर्षिल माने, योगेंद्र जहागीरदार यांनी सादर केले. फटाक्यांवर होणारा वारेमाप खर्च आणि त्यातून होणारे प्रदूषण टाळून फटाके नको, विमाने उडवा असे आवाहन यावेळी करण्यात आले. विमानांचे पंख, त्यांची माहिती तसेच कार्य याबाबतची माहिती यानिमित्ताने विमानांचा छंद असलेले सदानंद काळे यांनी दिली.