स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या ‘एअर शो’

हवेत उंच उडणारे विमान हा सर्वाच्याच कुतूहलाचा विषय आणि विमानातील विज्ञान हा आणखी आश्चर्याचा विषय आहे. विमानाचे हे विज्ञान सोप्या पद्धतीने समजावून देणारा ‘एअर-शो’ रविवारी (२३ ऑक्टोबर) स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

फटाक्यांवर होणारा वारेमाप खर्च, त्यातून होणारे प्रदूषण आणि अपघात टाळण्यासाठी ‘फटाके नको.. विमाने उडवा’ हा अभिनव उपक्रम रोटरी हिलसाईडतर्फे आयोजित करण्यात आला आहे. पर्यावरण रक्षण करण्याचा संकल्प करीत स्वत:च्या बौद्धिक कल्पनाशक्तीला आणि तांत्रिक कौशल्याला चालना देणारा असा विमाने उडवण्याचा छंद जोपासण्याचा संदेश देणारा हा एअर शो असून तो सर्व वयोगटातील नागरिकांना आनंद देणारा ठरणार आहे.

रेडीओ कंट्रोलच्या मदतीने इलेक्ट्रिकल मोटार आणि इंजिनावर उडणाऱ्या लहान मोठय़ा आकाराच्या, विविध प्रकारच्या थर्माकोल आणि लाकडाच्या अनेक विमानांच्या आकर्षक प्रात्यक्षिकांचा या एअर शोमध्ये समावेश आहे. अगदी खऱ्या लढाऊ विमानांप्रमाणे लूप, स्ट्रेट कंट्रोल, व्हर्टिकल रोल, नाईफ एज, स्पिन यांसारख्या थरारक कसरती करणारी रिमोटची लढाऊ विमाने शोमध्ये श्वास रोखायला लावतील. तसेच एक मोठे विमान हवाई पुष्पवृष्टी करणार आहे.

किमान एक तपाचा अनुभव असलेला निष्णात असा पुणे आणि नगर येथील  एरोमॉडेलर्सचा संघ ही प्रात्यक्षिके सादर करेल. मैदानामध्ये केवळ पन्नास ते दीडशे फुटांच्या योग्य मर्यादेतच ही प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत.  काश्मीर ते कन्याकुमारी असे रिमोटचे विमान उडवत नेण्याचा विक्रम करणारे नगरचे योगेंद्र जहागीरदार,

देशी-विदेशी स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळविलेला पुण्याचा हर्षिल माने हे या एअर-शोचे प्रमुख आकर्षण असतील. शोच्या ठिकाणी आकर्षक उडणाऱ्या विमानांचे संच अल्प किमतीत उपलब्ध असून विमानछंद सुरू करावयाचा आहे अशा जिज्ञासूंना ही संधी असल्याचे रोटरी हिलासईडच्या अध्यक्षा अ‍ॅड. प्रतिभा घोरपडे यांनी  सांगितले.