24 October 2017

News Flash

नथुराम गोडसेला क्रांतिकारक ठरवायला निघालेत की काय?- अजित पवार

यंत्रणेचा वापर कोणासाठी केला जात आहे?

पिंपरी-चिंचवड | Updated: October 7, 2017 9:41 PM

अजित पवार (संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येच्या फेरतपासाच्या याचिकेचा मुद्दा उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. जन हाहाकार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते. गांधीजींच्या हत्या प्रकरणाचा तपास नीट झालेला नाही असा दावा करत मुंबईस्थित डॉ. पंकज फडणीस यांनी हत्येच्या फेरतपासाची मागणी करणारी विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. यावर पवार म्हणाले की, “त्यांचं म्हणणं आहे की, नथुराम गोडसेनं चार गोळ्या झाडल्या होत्या, पण महात्मा गांधीचा जीव हा पाचव्या गोळीनं गेला. ती पाचवी गोळी कोणी झाडली त्याचा तपास करा. आता नथुराम गोडसेला निर्दोष ठरवायला त्याला क्रांतिकारक ठरवताय की काय?” असा सवाल त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, कॉम्रेड पानसरे, डॉक्टर दाभोलकर, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झाली. महाराष्ट्रात दोन आणि कर्नाटकातील दोन हत्या झाल्या. त्यांचे मारेकरी सापडले का? भारताची सुरक्षा यंत्रणा काय करत आहे? या यंत्रणेचा वापर कोणासाठी केला जात आहे, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भुमिकेवर पुन्हा एकदा तोफ डागली. सत्तेत उब घेत आंदोलन करणाऱ्या शिवसेनेला त्यांनी गांडुळाची उपमा दिली. ज्या प्रकारे गांडूळ दुतोंडी असतं तशीच शिवसेना झाली आहे. सरकारमध्ये राहून त्यांच्याविरुद्ध आंदोलन करता हे जनता जाणते, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनवर टीकास्त्र सोडले. सरकारमध्ये भाजपच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि दुतोंडी गांडुळासारखं वागायचं या पद्धतीच राजकारण भाजप आणि जातीवादी पक्ष करत आहेत, असा घणाघात पवारांनी केला.

First Published on October 7, 2017 9:29 pm

Web Title: ait pawar target on bjp gornment petition filed reinvestigation in assassinationof mahatma gandhi in pune