काहीतरी बोलून अडचणीत येण्याचा पूर्वानुभव असलेले आणि सध्या चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, प्रसारमाध्यमांच्या ‘ब्रेकिंग न्यूज’साठी आणि त्यांच्या चर्चेला खुराक मिळावा म्हणून मी काहीही बोलणार नाही, अशी सावध टिप्पणी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना केली. राष्ट्रवादीतील काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेले असले तरी इतर पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या टीकेविषयी तसेच त्यांनी व्यक्त केलेल्या भाकिताविषयी पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर अजितदादा म्हणाले, कोणी काय बोलावे, हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे आणि सत्ताधारी खासदाराने काय विधाने करावीत हा त्यांचा प्रश्न आहे. सध्या माझी चौकशी सुरू आहे, विचारलेल्या लेखी प्रश्नांना आपण उत्तरे दिली आहेत. एकदा पाच तास चौकशी झाली.

सर्व तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची आपली भूमिका आहे. आपण सद्सदविवेक बुद्धीला स्मरून वागतो. पुणे, िपपरीतील जनता २५ वर्षांपासून आपल्याला ओळखते. त्यामुळे कोणी काय आरोप करतो, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ते काहीही बोलणार, मी प्रत्युत्तर देणार. प्रसारमाध्यमांना मुद्दे मिळणार, मग चर्चेला खुराक मिळणार. मला ते करायचे नाही. तुमच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ साठी मी काहीही बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर, इतर पक्षातील अनेक नेते आपल्या संपर्कात आहेत. योग्य वेळी तेही आमच्याकडे येतील, असे उत्तर त्यांनी दिले. राष्ट्रवादीत गटबाजी नवीन नाही. सर्वाचे ऐकून घेत मार्ग काढण्याची आपली भूमिका आहे.

सर्व जाती, धर्माला तसेच स्थानिक, बाहेरचा असा भेद न करता आपण पदांचे वाटप केले. ज्यांना पदे दिली, आमदार केले, ते सर्व जण स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले, अशी टीका त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना उद्देशून केली. त्यांच्यावर त्यांच्याच पक्षात कोणाचाही विश्वास नाही. सत्तेसाठी एका झटक्यात २५ वर्षांचे संबंध तोडू शकणारा आमची सत्ता गेल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती करू शकतो, असे भाजपमधील नेते मला सांगतात, असेही ते म्हणाले.

चारसदस्यीय प्रभागासाठी राष्ट्रवादी तयार

महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यांचा प्रभाग असला तरी आमची लढण्याची तयारी आहे. मात्र, मुंबईत एकसदस्यीय पद्धत, नगरपालिका हद्दीत दोन सदस्यांचा प्रभाग आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेून, असे वेगवेगळे निर्णय सरकार घेत आहे. याविरुद्ध काही जण न्यायालयात दाद मागणार आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यास योग्य तो निवाडा न्यायालयाकडून होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.