‘चायना मेड’ शिलाई मशीनचे वाटप, ‘घरकुल’च्या सदनिकांचे रखडलेले वाटप, खासगी कंपन्यांचे खोदाई शुल्क आणि पाणीकपात यासारख्या विविध विषयांवर चर्चा करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी िपपरीतील आगामी वर्षभरातील योजना व प्रकल्पांची सविस्तर माहिती आयुक्त राजीव जाधव यांच्याकडून घेतली. िपपरीत दिवसाआड पाणीकपातीचा निर्णय झाल्यानंतरही त्याची अंमलबाजवणी न झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, िपपरीत पाणीकपात करावीच लागेल, असे त्यांनी बैठकीत निक्षून  सांगितले.
अजितदादांच्या उपस्थितीत पुनावळे येथे झालेल्या राष्ट्रवादी नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, पक्षनेत्या मंगला कदम, ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत गावडे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक बैठकीस उपस्थित होते. अडीच तास चाललेल्या या बैठकीत शमीम पठाण, तानाजी खाडे, प्रशांत शितोळे आदी सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. महिला बालकल्याण समितीने ‘चायना मेड’ शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे, याकडे अजितदादांचे लक्ष वेधले. तेव्हा दर्जेदार कंपन्यांकडून मशीन खरेदी कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. तानाजी खाडे यांनी, घरकुलच्या सदनिकांचे वाटप रखडल्याचे निदर्शनास आणून दिले, तेव्हा या संदर्भात तोडगा काढण्याच्या सूचना अजितदादांनी आयुक्तांना दिल्या. खासगी कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या शुल्कातील तफावतीचा मुद्दा प्रशांत शितोळे यांनी मांडला. सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर विकासकामांना वेग देण्याच्या तसेच चुकीची कामे न करण्याचा सल्ला अजितदादांनी नगरसेवकांना दिला. आयुक्तांनी आगामी वर्षांतील अंदाजपत्रकाचे सादरीकरण केले. त्या संदर्भात सविस्तर माहिती घेत अजितदादांनी आयुक्त व पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.
आयुक्तांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बैठक असताना महापालिका आयुक्त राजीव जाधव तेथे उपस्थित होते, त्यांची तेथील उपस्थिती बेकायदेशीर होती, असा मुद्दा उपस्थित करत शहर भाजपने आयुक्तांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. पक्षाचे माजी सरचिटणीस अमोल थोरात यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे दिले असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
‘पोटनिवडणूक जिंकलीच पाहिजे’
चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला पाहिजे, अशी सक्त ताकीद अजित पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत छुपी युती झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती, त्याची दखल अजितदादांनी घेतली. बैठकीच्या निमित्ताने शहरात आल्यानंतर निवडणुकीची माहिती घेतानाच उमेदवार निवडून आणण्याचे आदेश त्यांनी दिले.