समाजात जनजागृती व्हावी, या उदात्त हेतूने उत्सव सुरू झाले. जवळपास सव्व्वाशे वर्ष होत आलेल्या गणेशोत्सवात काही चुकीच्या प्रथा निर्माण होऊ पाहत आहेत. कोणत्याही परिस्थितीत वर्गणीची सक्ती होता कामा नये, ती ऐच्छिकच असली पाहिजे. उत्साहाच्या भरात उत्सवाला गालबोट लावू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी िपपरीत बोलताना केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्या मंडळांना पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, खासदार अमर साबळे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पवार म्हणाले,की उत्सवात चुकीच्या गोष्टी होता कामा नयेत. गाडय़ा अडवून किंवा सक्तीने वर्गण्या गोळा करण्याचे प्रकार चुकीचे असून भविष्याच्या दृष्टीने मारक आहे. भोसरीत जो प्रकार घडला, तो पुन्हा होता कामा नये. समाजाचे प्रतििबब देखाव्यांमधून व्यक्त होत असते. त्यातून कोणाचा अनादर होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यावी. गणेश मंडळांनी कामामध्ये सातत्य राखले पाहिजे. बक्षिसातून मंडळांना प्रोत्साहन मिळते, हुरूप मिळतो. वृक्षलागवडीचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे. सत्काराच्या कार्यक्रमात बुके न देता रोपे दिली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परीक्षकांच्या वतीने संतोष ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अशोक गोडसे यांनी केले. सूत्रसंचालन महेश सूर्यवंशी यांनी केले.