‘नगरपालिका निवडणुकीतील भाजपचे यश म्हणजे कावळा बसला आणि फांदी तुटली’

हजार व पाचशेच्या नोटा बंद करण्याचा मोदी सरकारचा निर्णय आणि भाजपला नगरपालिका निवडणुकीत मिळालेले यश, याचा काहीही संबंध नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ आली, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळे निलखला पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. एकाच्या हट्टापायी देशातील नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे असून नोटाबंदी तसेच सोन्यासंदर्भातील निर्णय हुकूमशाही पद्धतीचा आहे, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

पवार म्हणाले, की काळा पैसा देशातून नष्ट झाला पाहिजे, याविषयी दुमत नाही. मात्र, सामान्यांना प्रचंड झळ बसू लागली आहे. पगारांच्या तारखेला नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. गोरगरिबांची चूल पेटणे अवघड झाले आहे.

दुर्गम, ग्रामीण भागाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. जिल्हा बँका, पतसंस्थांचा कारभार ठप्प झाला आहे. सहा महिने ही परिस्थिती राहील, असे तज्ज्ञ सांगतात. दररोज वेगवेगळे आदेश दिले जात आहेत. १२५ कोटी जनतेपर्यंत दोन हजाराच्या नोटा पोहोचल्या नाहीत, मात्र दहशतवाद्यांकडे त्या कशा गेल्या, याची चौकशी झाली पाहिजे. नगरपालिका निवडणुकीत मराठवाडय़ात चांगले यश मिळाले. मात्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपने निवडणुकीत सत्तेचा पुरेपूर वापर केला.

विमान, हेलिकॉप्टरचा व मंत्रीपदाचा वापर झाला. राज्यात, केंद्रात सरकार असल्याचे सांगत विविध आश्वासने दिली गेली, त्याचाच भाजपला उपयोग झाला.

‘भ्रष्टाचार असल्यास कारवाई करा’

लक्ष्मण जगताप ज्योतिषी नाहीत. त्यांचे राष्ट्रवादीवरील आरोप खोटे आहेत. सरकार त्यांचे आहे. िपपरी पालिकेत भ्रष्टाचार झाला असल्यास खुशाल कारवाई करावी. तसे न करता राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. जे नगरसेवक भाजपमध्ये गेले, त्यातील सात-आठ जणांना स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले आहे. आमचे डावे-उजवे म्हणून मिरवणारेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मात्र जनता दुधखुळी नाही. खरा चेहरा व खोटा मुखवटा ते ओळखतात, असे प्रत्युत्तर अजित पवारांनी भाजपला दिले.