मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांचे काँग्रेस प्रवेश करवून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनीही तोच कित्ता गिरवला. तथापि, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात वर्षांनुवर्षे अजितदादांचे खंदे समर्थक राहिलेले आमदार विलास लांडे व लक्ष्मण जगताप यांनी मात्र राष्ट्रवादी प्रवेश टाळला. तापलेल्या राजकीय वातावरणातही निर्णयाचे गूढ कायम ठेवून या आमदारद्वयीने कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचा वेळकाढूपणा बुधवारी केला. सातत्याने पाठपुरावा करूनही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले नाहीत, हा तक्रारीचा सूर कायम ठेवतानाच, विकासकामांचे श्रेय मिळाले नाही आणि न झालेल्या कामांचे खापर मात्र फुटले, अशी खंतही व्यक्त केली.
विलास लांडे व लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय भूमिकेविषयी वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. बुधवारी दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, तेव्हा ते ठोस घोषणा करतील, अशी अटकळ होती. तथापि, कौल गुलदस्त्यात ठेवून त्यांनी पत्रकार परिषदेत ‘टाईमपास’च केला. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे पालूपद लावले. रोज वेगवेगळ्या वावडय़ा उठत आहेत. अशा चर्चेत एकही पक्ष राहिला नाही, ज्यांच्याशी आम्ही संपर्क साधला नाही, अशी खिल्ली त्यांनी उडवली. झालेल्या चुकांवर, दूर गेलेल्या नाराज कार्यकर्त्यांविषयी आत्मचिंतन करत असून कार्यकर्त्यांची मते घेत आहोत. ते लढ म्हटले तर लढू अथवा वेळप्रसंगी थांबू. विरोधकांना भीत नाही, मात्र स्वकीयांची चिंता आहे. आम्ही कितीही चांगली कामे केली तरी विरोधक टीका करणारच आहेत. त्यांनी काय कामे केली, त्याची देखील विचारणा व्हायला हवी. अनधिकृत बांधकामे व शास्तीकरासाठी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला, अजितदादांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही. आपल्यासाठी कायदा आहे, कायद्यासाठी आपण नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे होते. सत्तेच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे केली. मात्र, त्याचे श्रेय कधीच मिळाले नाही. न झालेल्या कामांचे खापर मात्र आमच्यावर फुटले, अशी टिपणी त्यांनी केली.