बलाढय़ राष्ट्रवादीची पडझड, नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे लागलेली गळती, नेत्यांची उघड गटबाजी आणि महत्त्वाचे नेते म्हणवून घेणारे आपापल्या प्रभागांमध्ये अडकून पडणार असल्याने िपपरी पालिकेची सत्ता पुन्हा हस्तगत करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवडणुकीत पुरती दमछाक होण्याची चिन्हे आहेत.

लक्ष्मण जगताप, महेश लांडगे हे दोन आमदार भाजपच्या गळाला लागले, तर विलास लांडे, आझम पानसरे हे राष्ट्रवादीचे ताकदीचे मोहरे नाराज आहेत. अन्य नेते स्वत: कसे निवडून यायचे, हेच पाहणार असल्याने शहरभराची व्यूहरचना करताना अजित पवारांची कसोटी लागणार आहे.

पिंपरीतील स्थानिक पातळीवरील ताकदीचे नेते हेच राष्ट्रवादीचे खरे बलस्थान आहे. प्रत्येक नेता ताकदीनुसार नगरसेवक निवडून आणतो, त्याची गोळाबेरीज करून राष्ट्रवादी सत्तेपर्यंत जाते. त्याचे श्रेय मात्र अजित पवारांना मिळते. गेल्या तीन निवडणुकांमध्ये सत्तेचे हेच सूत्र राहिले.

विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने पानसरे, लांडे तीव्र नाराज आहेत. यंदा दोघांचीही मुले राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहेत. थोडय़ाफार फरकाने हनुमंत गावडे यांची तीच परिस्थिती आहे. त्यांचा मुलगा चिंचवडमधून िरगणात उतरतो आहे. मुलाला निवडून आणणे हाच पानसरे, लांडे यांच्याप्रमाणे गावडे यांचाही प्राधान्यक्रम राहणार आहे. विधानसभेत पराभूत झाल्यापासून बनसोडे पक्षाच्या मुख्य प्रवाहात नाहीत. संजोग वाघेरे पक्षसंघटनेत एकाकी आहेत. प्रभागस्तरावर भावकीनेच त्यांची गोची करून ठेवली असल्याने पत्नी उषा वाघेरे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. योगेश बहल पक्षात नेते असले तरी प्रभागाबाहेर त्यांचे काही चालत नाही. लगतच्या नेहरुनगरमध्ये भोसले तर खराळवाडीत कदम बंधूंनी त्यांचे गेल्या निवडणुकीत काही चालू दिले नाही. यंदाही तशीच परिस्थिती आहे. डब्बू आसवानी स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. पद घेताना १० नगरसेवक निवडून आणण्याची ग्वाही त्यांनी अजित पवारांना दिली होती. प्रत्यक्षात त्यांचे स्वत: निवडून येण्याचे वांधे आहेत. मंगला कदम स्वत: उभ्या राहणार की मुलाला संधी देणार, याविषयी निर्णय प्रलंबित आहे. प्रभागाव्यतिरिक्त फार कुठे जाण्याची संधी त्यांना नाही.