‘अंदमान, निकोबार बेटांमध्ये आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय राजकीय विकासाच्या दृष्टीने खूप क्षमता आहे. येत्या काळात ही बेटं शेजारील देशांशी जोडण्यासाठी व त्यांच्याशी विविध क्षेत्रातील संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरू शकतील,’ असे मत अंदमान, निकोबारचे राज्यपाल निवृत्त ले. जनरल ए. के. सिंग यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामाजिकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिव्याख्यानमालेत सिंग बोलत होते. ‘अंदमान, निकोबार बेटांची आंतरराष्ट्रीय राजकीय भूमिका, सुरक्षा आणि विकासाचे मुद्दे’ या विषयावर सिंग यांनी आपले विचार मांडले. या वेळी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, संरक्षण आणि सामाजिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण दळवी उपस्थित होते.
या वेळी सिंग म्हणाले,‘‘स्वातंत्र्यपूर्व काळातही अंदमान निकोबार बेटांचा उपयोग हा संरक्षण दलाचा तळ म्हणून केला जायचा. पहिल्यापासूनच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या बेटांची भूमिका महत्त्वाची आहे. सध्याही शेजारील देशांबरोबरील संरक्षणाच्या दृष्टीने आणि आर्थिक संबंध चांगले ठेवण्यासाठी या बेटांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाकडे अधिक चांगल्याप्रकारे लक्ष देणे गरजेचे आहे. बेटांवरील पर्यावरणाचे जतन करून विकासही साधणे गरजेचे आहे, जेणेकरून आर्थिकदृष्टय़ा हा प्रदेश सक्षम होईल.’’
सावरकरांच्या वास्तव्याचा अंदमानला अभिमान
‘स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमध्ये वास्तव्यास होते याचा अंदमानला अभिमान आहे. सावरकर ज्या तुरुंगात बंदी होते, त्या तुरुंगालाही पर्यटकांकडून सर्वाधिक भेट दिली जाते. सेल्युलर जेलच्या परिसराचा येत्या काळात अधिक विकास करून तेथे आणखी नवी दालने सुरू करण्याचा मानस आहे,’ असे सिंग यांनी सांगितले.