दारूचे दुष्परिणाम या सामाजिक विषयावर मार्मिक भाष्य करणारे.. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांची पल्लेदार वाक्ये..  त्या वेळी वयाची सत्तरी ओलांडलेल्या जयमाला शिलेदार, चित्तरंजन कोल्हटकर आणि शरद तळवलकर या तीन दिग्गजांचा अभिनय.. संगीत रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या रसिकांना शुक्रवारी (२१ ऑगस्ट) ‘संगीत एकच प्याला’ नाटकाच्या दुर्मिळ ध्वनिफितीद्वारे हा अनुभव घेता येणार आहे.
आपल्या गायन आणि अभिनयाने मराठी संगीत रंगभूमीवर देदीप्यमान कारकीर्द जागविणाऱ्या जयमाला शिलेदार यांच्या ९० व्या जन्मनदिनाचे औचित्य साधून मराठी रंगभूमी संस्था आणि शिलेदार कुटुंबीयांतर्फे हा योग जुळवून आणण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रेक्षागृह येथे सायंकाळी पाच वाजता ही ध्वनिचित्रफीत पाहता येणार आहे. संगीत रंगभूमीवरील या अलौकिक नाटकाविषयी ज्येष्ठ नाटय़समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे विवेचन करणार आहेत. वयाची सत्तरी ओलांडली असूनही या तीन दिग्गजांचा तडफदार अभिनय यानिमित्ताने संगीत नाटय़प्रेमी रसिकांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आसनव्यवस्था ठेवण्यात आली आहे.