मान्यतेसाठी भोगवटा प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश

पुढील शैक्षणिक वर्षांत अभ्यासक्रमाला मान्यता मिळण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र, इमारतीच्या पूर्णत्वाचे प्रमाणपत्र यांसह इतर अनेक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने महाविद्यालयांना दिले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर इमारती उभ्या करून महाविद्यालय चालवणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.

परिषदेने या वर्षीपासून नव्या अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी भोगवटा प्रमाणपत्र, इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला देणे बंधनकारक केले आहे. पुढील वर्षांच्या मान्यतेसाठी ही सर्व कागदपत्रे सादर करणे परिषदेने आता बंधनकारक केले आहे. मात्र या शैक्षणिक वर्षांत फक्त नव्याने अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या संस्थांना ही कागदपत्रे बंधनकारक करण्यात आली होती. जुन्या संस्थांना यामधून सूट देण्यात आली. मात्र आता पुढील शैक्षणिक वर्षांत (२०१७-१८) अभ्यासक्रमाला मान्यता मिळवण्यासाठी जुन्या महाविद्यालयांनाही ही सर्व कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. त्यामुळे बेकायदेशीर इमारतीत महाविद्यालये चालवणाऱ्या, परवानगीपेक्षा जास्त बांधकाम करणाऱ्या संस्थांचे धाबे दणाणले आहे.

महाविद्यालयाची मान्यता घेताना संस्थेकडून ही कागदपत्रे सादर करण्यात येतात. मात्र त्यानंतर अनेक महाविद्यालयांनी पत्ते बदलले असल्याच्या, भाडेतत्त्वावर जागा घेऊन त्यात महाविद्यालय सुरू असल्याच्या तक्रारी परिषदेकडे आल्या होत्या. त्यानंतर परिषदेने प्रमाणपत्रे सादर करण्याचे पत्र संस्थांना दिले आहे.

भोगवटा प्रमाणपत्र देताना महाविद्यालयाने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे का, अग्निशामक दलाचे आणि प्रदूषण महामंडळाचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असते. त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे परिषदेने म्हटले आहे. मान्यतेसाठीच्या अर्जाबरोबर ही कागदपत्रे जोडण्याची सूचना महाविद्यालयांना परिषदेने केली आहे.