पुणे महापालिकेचा देशातील पहिला कर्जरोखे गुंतवणुकीसाठी खुले करण्याचा शुभारंभ मुंबई शेअर बाजारमधील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री व्यंकय्‍या नायडू यांच्या हस्ते शेअर बाजाराच्या परंपरेप्रमाणे घंटा वाजवून पुणे महापालिकेचे कर्जरोखे गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले. देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जूनराम मेघवाल, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नायडू म्हणाले की, शहरे ही विकासाचे इंजिन आहेत. शहरे ही विकासाची यंत्रे आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकांनी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात शहर विकासाकरीता ४.१३ लाख कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जातो. विकास प्रकल्पांना वित्तीय मदत मिळाल्यास त्याची गती निश्चितच वाढेल. शहर विकासाचा आराखडा तयार करताना स्थानिक नागरिकांनी त्यात सहभागी व्हायला हवे.

पुणे महापालिकेसह राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, नागरी प्रशासनाच्या कामात परिवर्तन होताना दिसत आहे. विविध पायाभुत सुविधांच्या विकास प्रकल्पांना वित्तीय पुरवठा करण्यासाठी नवीन साधनांची गरज भासते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले होते की, महापालिकेने स्वत:चा निधी उभारण्यासाठी शेअर बाजारात बॉण्ड आणावेत. या आवाहनाला सकात्मक प्रतिसाद देत २ हजार २६४ कोटी रुपयांचे बॉण्ड पुणे महापालिकेने गुंतवणूकीसाठी दाखल केले आहेत. पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली असून या बॉण्डच्या माध्यमातून जो निधी उभारला जाईल. त्याद्वारे स्मार्ट पुणे शहर निर्माण होईल. पुणेकरांना २४ तास पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, उत्तम घनकचरा व्यवस्थापन अशा सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

येत्या दोन ते तीन वर्षात पुणे शहरामध्ये घनकचऱ्याचे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरातील सांडपाण्याचा प्रत्येक थेंबावर प्रक्रिया केली जाईल. मेट्रो आणि सार्वजनिक दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे. पुणेकरांना २४ तास पाणी पुरवठा केला जाईल. जलवाहिन्यांसोबत फायबर नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.