पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील प्रमुख राजकीय नेते शनिवारी ‘दिवाळी फराळ’च्या निमित्ताने एकत्र आले. एतर वेळी असलेले मतभेद विसरून रंगलेली त्यांची गप्पांची मैफल सुमारे अडीच तास रंगली. गतस्मृतींना उजाळा देत विनोद-किश्शांची देवाण-घेवाण करत एकमेकांची फिरकी घेण्याची संधी नेत्यांनी सोडली नाही.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने निगडी-प्राधिकरणात आयोजित ‘दिवाळी फराळ’ या कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, मनसेचे शहरप्रमुख सचिन चिखले यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे, निहाल पानसरे, वेणू साबळे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान असलेले विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते दिवाळी फराळाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले. या गप्पांच्या मैफलीत १९८६ ते २०१७ पर्यंतच्या जवळपास ३० वर्षांच्या राजकीय प्रवासातील विविध आठवणींना उजाळा देण्यात आला. विनोदी व भन्नाट किस्से सांगत खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांची फिरकी घेण्याची संधी नेत्यांनी सोडली नाही. जनहितासाठी तसेच शहर विकासासाठी एकत्र काम करण्याची ग्वाही या निमित्ताने त्यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष गोरख भालेकर यांनी स्वागत केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. सचिन साठे यांनी आभार मानले.

((   पिंपरी-चिंचवडचे प्रमुख नेते शनिवारी ‘दिवाळी फराळ’ निमित्त एकत्र आले होते. ))