सार्वजनिक प्रवासासाठीच्या इतर वाहनांप्रमाणेच रुग्णवाहिकेचेही भाडेपत्रक असावे आणि मनमानी भाडेआकारणी होऊ नये, या उद्देशाने पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रुग्णवाहिकांच्या प्रकारानुसार त्यांचे भाडेपत्रक निश्चित केले आहे. मात्र, चार वर्षांपासून मनमानी पद्धतीने भाडेवसुली करणाऱ्या रुग्णवाहिकांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने हे भाडेपत्रक कागदावरच राहिले आहे. तातडीच्या प्रसंगीच रुग्णवाहिकेची आवश्यकता असते, त्यामुळे अशा प्रसंगी वाढीव भाडेवसुलीबाबत वाच्यता केली जात नसल्याने अनेकांचे फावते आहे.
रुग्णवाहिकेची सेवा घेतल्यास अगदी कमी अंतरापर्यंतही काही हजार रुपये उकळले जातात. रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी वाहिकेची त्या वेळची गरज पाहता रुग्णाचे नातलगही मनमानी भाडेआकारणीला बळी पडतात. रुग्णवाहिकेच्या भाडय़ाबाबत होणाऱ्या तक्रारींकडे सजग नागरिक मंचच्या वतीने काही वर्षांपूर्वी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे लक्ष वेधले होते. काही तक्रारीही प्राधिकरणासमोर मांडल्या होत्या. शहरातील रिक्षा, टॅक्सीचे भाडे प्राधिकरण ठरविते. त्याप्रमाणे रुग्णवाहिकेचे दरपत्रकही ठरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.
प्राधिकरणाने या मागणीची गांभीर्याने दखल घेतली व रुग्णवाहिकांचे प्रकार, त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवेचा अभ्यास केला. रुग्णवाहिकेची सेवा देण्यासाठी लागणारा खर्च व इतर सर्व गोष्टींना रिक्षा, टॅक्सीच्या सेवेप्रमाणे अभ्यास करून २१ ऑगस्ट २०१३ रोजी रुग्णवाहिकांसाठी भाडेपत्रक जाहीर केले. मात्र, प्राधिकरणाने हे भाडेपत्रक जाहीर करण्यापलीकडे काहीही केले नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर रिक्षा व टॅक्सीच्या भाडेपत्रकाबरोबरच रुग्णवाहिकांचे भाडेपत्रकही टाकण्यात आले आहे. मात्र, आरटीओनेही मागील चार वर्षांत रुग्णवाहिकांच्या बाबतीत कोणतीही कारवाई केलेली नाही. आजही बहुतांश रुग्णवाहिकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते. रुग्णवाहिकेची सेवा देताना भाडेपत्रकाचा आधार कुठेही घेतला जात नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातलगांची लूट सुरूच आहे.

आरटीओच्या आदेशांना हरताळ
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) रुग्णवाहिकांचे दरपत्रक जाहीर करताना हे दरपत्रक प्रत्येक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार रुग्णालयात दरपत्रक लावणे बंधनकारकही करण्यात आले आहे. मात्र, सद्य:स्थितीत कोणत्याही रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णवाहिकांचे दरपत्रक नाही. रुग्णवाहिकांबरोबरच दरपत्रक नसल्याबाबत कोणत्याही रुग्णालयावर आजवर कारवाई झालेली नाही.