माता अमृतानंदमयी मठाचा दावा

प्राधिकरणाने संस्थेकडे मागितलेली रक्कम चुकीची असल्याचा दावा माता अमृतानंदमयी मठाने केला असून त्यामुळेच ही रक्कम प्राधिकरणाकडे भरली नसल्याचे संस्थेतर्फे गुरुवारी सांगण्यात आले.

माता अमृतानंदमयी मठाकडे असलेल्या थकबाकी संबंधीचे वृत्त गुरुवारी ‘लोकसत्ता (पुणे)’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्या बाबत स्वामी विद्यामृतानंद पुरी यांनी सांगितले की, प्राधिकरणाने संस्थेला सवलतीच्या दराने जागा दिली होती. या जागेच्या मूल्याबाबत लेखापरीक्षणात जे आक्षेप घेण्यात आले ते प्राधिकरण प्रशासनाने निरस्त करून देणे आवश्यक होते. आम्ही त्याबाबत वारंवार कळवूनही प्राधिकरणाने कार्यवाही केली नाही. आमच्याकडे मागण्यात आलेली रक्कम चुकीची आहे असे आमचे म्हणणे आहे. तसे आम्ही कळवले होते. या थकबाकीबाबत आमची बांधकाम परवानगीही थांबवण्यात आली होती. मात्र त्यावर आम्ही शासनाकडे अपील केल्यानंतर मूल्य वसुली हा विषय बांधकामाशी निगडित करू नये असे शासनाने कळवले होते. प्राधिकरणाने सर्व संस्थांना समान न्याय द्यावा अशीही आमची मागणी आहे. तसे निर्देश अध्यक्षांनी दिले होते. त्याप्रमाणे कायदा सल्लागारांचा अभिप्राय घेण्यात आला आहे, तो पाहता प्राधिकरणाची मागणी चुकीची आहे.

प्राधिकरणाने केलेल्या मागणीविरुद्ध आम्ही शासनाकडेही पत्रव्यवहार केला आहे. आम्हाला सुरुवातीला जो विशेष सवलतीचा दर दिला आहे तोच नियमानुसार योग्य आहे, असेही स्वामी विद्यामृतानंद पुरी यांनी सांगितले.