अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात सरकार अपयशी ठरले असून आता गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात दिरंगाई होता कामा नये. सरकारने तातडीने पावले उचलून त्यांच्या मारेकऱ्यांना पकडावे, अशी मागणी अंनिसचे राज्याचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी मिलिंद देशमुख म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येला चार वर्षांचा कालवधी होऊन देखील मारेकरी सापडत नाहीत. दाभोलकरांच्या हत्येनंतर देशात तीन हत्येच्या घटना घडल्या. हत्येप्रकरणी तपासात कोणत्याही प्रकारची गती दिसत नाही. गौरी लंकेश घटनेतील आरोपींना तात्काळ पकडावे, अशी मागणी त्यांनी केली.

अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गणपतीच्या मूर्ती विकल्या, हा खोटा मेसेज पसरवणारी व्यक्ती सापडल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या, असल्याचे खोटे मेसेज व्हॉटसअॅप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली असून या मेसेजचा माग काढत हे खोटे मेसेज पाठवणाऱ्याचा छडा लावण्यात यश आले आहे. नाशिकमधील एका संघटनेशी संबधीत असलेली व्यक्तीने हे चुकीचे मेसेज पसरवले. या व्यक्तीवर सध्या कारवाई सुरू आहे, अशी माहिती देशमुख यांनी सांगितले.