लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद येथील उमेदवार पद्मसिंह पाटील यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर विरोध केला होता. त्यानंतर अण्णांना धमकीचे फोन आले होते. त्यामुळे अण्णांना सध्या असलेली झेड दर्जाची सुरक्षा अपुरी असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी अण्णांचे पुणे येथील वकील अॅड. मिलिंद पवार यांनी राज्य आणि केंद्र शासनाकडे केली आहे.
पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे ही मागणी केली असून त्याबाबत नोटीस पाठविली आहे. याबाबत पवार यांनी सांगितले, की अण्णा हजारे यांच्या खुनाची सुपारी पद्मसिंह पाटील यांनी दिली असल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले होते. त्यानंतर अण्णांनी पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर विरोध केला होता. पाटील यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी अण्णांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यातून पाटील यांचा राग व्यक्त होत आहे. पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आहे. त्यातील खरे मारेकरी व सूत्रधार अद्यापही सापडलेली नाही. अण्णांनाही ‘तुमचा दाभोलकर करू’, अशाही धमक्या आल्या आहेत. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अण्णांना विशेष सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे. याबाबत अण्णांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांच्याशी बोलणे झाल्यानंतर त्यांनीही अण्णांना विशेष सुरक्षा असवी, असे सांगितले आहे, अशी माहिती अॅड. पवार यांनी दिली.