निसर्ग आणि मानवतेचे शोषण करून सुरू असलेला सध्याचा विकास हा शाश्वत नाही. या शोषणाला वेळीच आळा घातला नाही तर विनाश नक्की आहे, अशी भीती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी व्यक्त केली.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन हजारे यांच्या हस्ते झाले. मंगळवापर्यंत (३१ मे) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले आहे. स्वार्थाने भरलेल्या राजकारणामुळे सध्या समाजामध्ये नि:स्वार्थपणे सेवा करणाऱ्यांची कमतरता जाणवत असल्याचे सांगून अण्णा हजारे म्हणाले, समाज आणि राष्ट्रहिताचे कार्य करणारे कार्यकर्ते घडले पाहिजेत.
या कार्यकर्त्यांच्या अंगी शुद्ध आचार-विचार आणि त्याग हे गुणधर्म असणे गरजेचे आहे. समाजाला सध्या भेडसावणारे पाणी, विषमता आणि गरिबी हे प्रश्न तेंडुलकर यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडले आहेत. ही चित्रे पाहून समाजातील व्यंग दुरुस्त करण्याची प्रेरणा सर्वाना मिळेल. शब्दांच्या वापराविना अपेक्षित अर्थ सर्वांपर्यंत पोहोचविणे ही व्यंगचित्रांची खरी ताकद असते, असे मत तेंडुलकर यांनी व्यक्त केले.