घरगुती चवीचा बटाटा वडा आणि भाजणीचा वडा ही अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटरची खासियत आहे. इथे मोजकेच पदार्थ मिळत असले तरी पारंपरिक चवीचा इथला अनुभव काही वेगळाच असतो. इथे आपल्या समोरच पदार्थ तयार होत असतात. ताजे, गरम आणि चटकदार पदार्थ हे या स्नॅक्स सेंटरचं वैशिष्टय़ं..

खवय्यांची पावलं बरोबर योग्य त्या दिशेनंच नेहमी पडत असतात. बुधवार पेठेत शिवाजी रस्त्यावर प्रकाश डिपार्टमेंटल स्टोअरला लागून असलेल्या एका छोटय़ा गल्लीत असलेलं अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटर हे असंच एक ठिकाण. त्या छोटय़ाश्या गल्लीत पायी जाणंच चांगलं. दुचाकी नेली तरी ती लावायची कुठे हा मोठा प्रश्न असतो. जुन्या पुण्यातल्या गल्ली बोळांची आणि तेथील वाडय़ांची जशी रचना आहे तशीच ही एक गल्ली. इथेच तुम्हाला अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटर हे खवय्यांच्या अगदी आवडीचं असलेलं एक ठिकाण दिसेल. मधुकर गाडगीळ यांनी पत्नी अनुराधा यांच्या मदतीनं १९८७ मध्ये सुरू केलेला हा व्यवसाय. गाडगीळांना सगळे जण बाबा म्हणतात आणि केवळ खाद्यपदार्थ तयार करून ते विकायचे एवढंच काम न करता बाबांनी येणाऱ्या प्रत्येकाबरोबर छान संबंध प्रस्थापित केले आहेत. सुरू झाले तेव्हापासूनच या स्नॅक्स सेंटरची वेळ सायंकाळी पावणे पाच ते रात्री साडेआठ-पावणेनऊ अशी होती आणि तीच वेळ आजही आहे.

हे स्नॅक्स सेंटर सुरू झालं तेव्हा फक्त बटाटा वडा एवढा एकच पदार्थ तिथे विकला जायचा. अर्थात वेगळ्या चवीचा हा वडा अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आणि मग त्याची ख्याती पसरत गेली. आवर्जून वडा खायला येणारी मंडळी पुढे वडय़ाबरोबर पावाची मागणी करू लागली. त्यातून वडा-पाव सुरू झाला. पुढे त्याला इडली चटणीची जोड मिळाली. अधुनमधून केव्हातरी भाजणीचे वडे इथे तयार केले गेले. तेही ग्राहकांना खूप आवडले. त्यातून मग नियमितपणे भाजणीचा वडा इथे मिळायला लागला. त्याच्या जोडीला नंतर साबुदाणा वडा, ओल्या नारळाची करंजी पुढे मग शेंगदाणा लाडू असेही पदार्थ आले. अर्थात ही यादी एवढीच. मात्र या पदार्थाच्या आस्वादासाठी आणि त्या पदार्थाची चव चाखण्यासाठी खवय्ये पुन्हा पुन्हा इथे येत असतात.

हिरवी मिरची, आलं, लसूण, थोडा लिंबू रस आणि साखर यांच्या मिश्रणातून तयार होणारा इथला बटाटा वडा असो किंवा घरगुती भाजणीचे कांदा न घालता तयार केले जाणारे भाजणी वडे असोत.. हे इथले लोकप्रिय पदार्थ. शिवाय इथली ओल्या नारळाची करंजी ही देखील वैशिष्टय़पूर्ण. कच्चा माल अतिशय चोखंदळपणे खरेदी करायचा आणि जे पदार्थ द्यायचे त्याच्या चवीत, दर्जात जराही कमतरता ठेवायची नाही, हे तत्त्व गाडगीळ यांनी वर्षांनुवर्ष पाळलं आहे. त्यामुळे इथे मिळणाऱ्या पदार्थाची चव, दर्जा यात जराही कधी फरक होत नाही. शिवाय वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची जी पद्धती ठरली आहे त्यातही गाडगीळ कधी कुणाला बदल करू देत नाहीत.

दिवसभर जेवढे वडे लागतील तेवढय़ा वडय़ांसाठी लागणारे म्हणजे पंधरा-वीस किलो बटाटे एकदम उकडून ठेवायचे आणि नंतर वडय़ासाठीची भाजी एकदम करून ठेवायची, अशी इथली पद्धत नाही. इथे सगळा मामला कुकरप्रमाणे चालतो. म्हणजे प्रत्येकवेळी एक कुकर एवढे बटाटे उकडून घेतले जातात. तेवढय़ाच बटाटय़ाची वडय़ासाठी भाजी तयार केली जाते. त्या घाण्याची चव बाबा बघतात आणि नंतर ग्राहकांच्या मागणीनुसार वडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. अशाच पद्धतीनं मागणीनुसार आणि ग्राहकांचा अंदाज घेत घेत बटाटा वडा, साबुदाणा वडा आणि भाजणी वडे तयार केले जातात. त्यामुळे ताजे आणि गरम पदार्थ मिळतात.

अन्नपूर्णामध्ये पहिल्यापासूनच सर्व कामांसाठी मदतनीस म्हणून महिलांनाच कामावर घेण्यात आलं. त्या निमित्तानं महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी गाडगीळ यांची इच्छा असायची आणि तीस र्वष हीच रीत कायम आहे.

मधुकर गाडगीळ यांचे भाचे जावई महेश गाडगीळ आणि त्यांची पत्नी सुचेता असे दोघे आता प्रामुख्यानं हा व्यवसाय चालवतात. मात्र व्यवसायाची पूर्वीची सारी पथ्यं हे दोघेही तंतोतंत पाळत असल्यामुळे खवय्यांचा प्रतिसाद वाढताच आहे. घरगुती चवीचे पदार्थ कसे असतात असं कुणी तुम्हाला विचारलं किंवा तुम्हालाही कधी तशी चव चाखावीशी वाटली तर या स्नॅक्स सेंटरची भेट अपरिहार्यच.

कुठे आहे?

  • अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटर ५७३ बुधवार पेठ, शिवाजी रस्ता

कधी?

  • सायंकाळी पावणेपाच ते रात्री साडेआठ रविवारी बंद