पुणे महापालिका शिक्षण मंडळाला त्यांचे सर्वाधिकार परत द्यावेत, असा स्पष्ट आदेश शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिल्यानंतरही मंडळाला त्यांचे अधिकार परत देण्याची कोणतीही कार्यवाही महापालिकेने अद्याप केलेली नाही. दरम्यान, शिक्षण मंडळाचा एक्याण्णवा वर्धापनदिन बुधवारी (१ एप्रिल) साजरा होत असून वर्धापनदिनी अधिकार कोणाकडे याचा निर्णय मात्र लागलेला नाही.
महापालिका शिक्षण मंडळाने मंडळाचा कारभार पहायचा का नाही याबाबतची संदिग्धता राज्य शासनाने सोमवारी दूर केली. शिक्षण मंडळाचे सर्वाधिकार मंडळाला परत दिले असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत जाहीर करतानाच महापालिका आयुक्त शिक्षण मंडळाला त्यांचे अधिकार देणार नसतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही निवेदन केले आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांनी अधिकारांबाबतचा संभ्रम अशाप्रकारे दूर केल्यानंतर मंडळाला अधिकार देण्याबाबत महापालिकेकडून काही तरी कार्यवाही सुरू होईल अशी मंडळाच्या सदस्यांना होती. मात्र महापालिका स्तरावर तसे काही घडले नाही.
शिक्षण मंडळाच्या सदस्यांचे अधिकार काढून घेतल्यानंतर गेल्या वर्षभरात मंडळाचा कारभार पूर्णत: ठप्प झाल्यासारखी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती त्यांना मिळालेल्या नाहीत, तसेच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत. मंडळाचा कारभार पाहण्यासाठी कोणतीही यंत्रणा सध्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आखण्यात आलेले व सुरू करण्यात आलेले सर्व उपक्रम बंद पडले आहेत. जे बचत गट महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन पुरवतात त्या गटांचेही पैसे थकवण्यात आले असून ते पैसे मिळावेत यासाठी बचत गटातील महिला सदस्य महापालिकेत चकरा मारत असल्याचा मुद्दा गेल्याच आठवडय़ात मुख्य सभेत उपस्थित करण्यात आला होता.
मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या ‘विद्यानिकेतन’ आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवान विद्यार्थ्यांसाठीचे ‘क्रीडानिकेतन’ या दोन्ही उपक्रमांकडेही दुर्लक्ष झाले आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या रिक्षाचालकांचे पैसेही वेळेवर दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच क्रीडा प्रशिक्षकांना त्यांचे मानधनही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. मंडळाचे अधिकार काढून घेण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणतेही साहित्य यंदा वेळेवर मिळू शकलेले नाही. या सर्व उणिवांमुळे सदस्यांना त्यांचे अधिकार परत मिळावेत असा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेतही दोन महिन्यांपूर्वी एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मात्र या सर्व परिस्थितीतही मंडळाचे अधिकार अद्यापही परत दिले गेलेले नाहीत.
महापालिका शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी विद्यार्थी गुणवत्तावाढ उपक्रम सुरू केला असून त्यासाठीची सभा मंगळवारी बोलावण्यात आली होती. अधिकारांबाबत महापालिकेने काही निर्णय घेतला का, असा प्रश्न या सभेत मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित केला. मात्र विधानसभेत जी घोषणा झाली आहे त्या घोषणेच्या अनुषंगाने महापालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच महापालिकेकडून मंडळाशी संपर्कही साधण्यात आलेला नाही, असा खुलासा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांनी या वेळी केला.