राज्य सरकारच्या अनुदानाविना साहित्य संमेलन स्वयंपूर्ण व्हावे, या उद्देशातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने स्थापन केलेल्या महाकोशामध्ये गेल्या २४ वर्षांत ९० लाख रुपयांची गंगाजळी जमा झाली आहे. हा निधी लवकरात लवकर संकलित करण्याच्या उद्देशातून आता मराठीप्रेमींना आवाहन करण्यात आले असून सासवड येथे होणाऱ्या ८७ व्या साहित्य संमेलनामध्ये पाच ठिकाणी दानपेटय़ा ठेवण्यात येणार आहेत.
यापूर्वी ठाणे, पुणे आणि चिपळूण येथील साहित्य संमेलनांमध्ये दानपेटी ठेवण्याचा प्रयोग साहित्य महामंडळाने राबविला होता. ठाण्याचा अपवाद वगळता त्याला हवा तेवढा प्रतिसाद लाभला नाही. आता सासवड येथील संमेलनामध्ये मुख्य प्रवेशद्वार, ग्रंथनगरी, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, दौलत चित्र मंदिर आणि नगरपालिका सभागृह या पाच ठिकाणी दानपेटय़ा ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबरीने ग्रंथनगरीतील महामंडळाच्या दालनामध्येही देणगीचे धनादेश स्वीकारले जाणार आहेत. ५०० रुपयांहून अधिक रकमेचे अर्थसाह्य़ करणाऱ्या व्यक्तीस तेथे पावती देण्यात येईल, अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.
महाकोशातील निधीवर येणाऱ्या व्याजातून गेल्या तीन संमेलनांमध्ये प्रत्येकी तीन लाख रुपयांचा खर्च महामंडळाने उचलला आहे. यंदाही सासवड येथील संयोजन समितीला निधीच्या व्याजातील रक्कम देण्यात येणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले. गेल्या तीन संमेलनांचा खर्च दोन कोटी रुपयांहून अधिक झाला होता. त्या तुलनेत सासवड येथील संमेलनामध्ये अवाजवी खर्च टाळून हे संमेलन साधेपणाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सव्वा कोटी रुपये खर्च होईल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साहित्य संमेलनाचे उद्घाटक शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनीही महाकोशामध्ये आपला खारीचा वाटा उचलावा, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

महाकोशाचा इतिहास
कोणत्याही मदतीविना साहित्य संमेलन स्वयंपूर्ण व्हावे ही संकल्पना कवी अनिल यांनी मालवण येथे १९५८ मध्ये झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून मांडली होती. मात्र, ती साकार होण्यासाठी १९९० साल उजाडले. कवी वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई येथील साहित्य संमेलनामध्ये सरकारी मदतीविना संमेलन घेण्याच्या उद्देशातून महाकोश प्रकल्पाची घोषणा साहित्य महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्षा वसुंधरा पेंडसे-नाईक यांनी केली होती. दोन कोटी रुपयांचा निधी संकलित करून संमेलन स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प झाला. मात्र, गेल्या २४ वर्षांत महाकोशामध्ये ९० लाख रुपयांची गंगाजळी संकलित झाली आहे.