अर्ज भरण्याची मुदत २४ ऑगस्टपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याकरिता जिल्ह्य़ातील महा ई सेवा केंद्रांमध्ये सहाशे बायोमेट्रिक यंत्रे शासनाने पाठवली आहेत. कर्जदार शेतकऱ्यांची ओळख पटवून त्यांची बायोमेट्रिक माहिती संकलित करून त्याला आधार क्रमांक जोडण्यात आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीसाठी सुचविण्यात येणार आहेत.

जिल्ह्य़ात आधीपासून उपलब्ध असलेली अडीचशे आणि शासनाकडून आलेली अशी एकूण साडेआठशे बायोमेट्रिक यंत्रे महा-ई सेवा आणि संग्राम केंद्र येथे बसविण्यात येणार आहेत. जिल्ह्य़ात ३ लाख ३९ हजार शेतकरी कर्जदार असून त्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २ लाख ९९ हजार, व्यावसायिक आणि खासगी बँकांचे अनुक्रमे ४० हजार कर्जदार आहेत. या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येणार असून त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

महा ई सेवा केंद्रांमध्ये कर्जमाफी योजनेचा अर्ज भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

अर्ज भरून घेण्यात कर्मचाऱ्यांना रस नाही

महा ई सेवा केंद्राचे कर्मचारी पॅन कार्ड, आधार कार्ड काढणे, शेतकरी पीक विमा आणि कर्जमाफी योजनेचे अर्ज भरून घेणे अशी कामे करतात. कर्जमाफी योजनेच्या प्रत्येक अर्जामागे केवळ दहा रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात त्यांना रस नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्ह्य़ातील केंद्रांवर अर्ज भरून घेण्यासाठी सध्या कनेक्टिव्हिटीची अडचण असून एक अर्ज भरून घेण्यासाठी एक तासाचा कालावधी लागत आहे. मात्र, कनेक्टिव्हिटी नसल्यास संबंधितांस टोल फ्री क्रमांक देण्यात येणार असून त्याद्वारे एक-दोन दिवसांत शेतकरी अर्ज भरू शकणार आहेत. दोन पानांच्या अर्जात कुटुंबाची माहिती आणि अपात्रतेच्या निकषात बसत नाही असे घोषणापत्र आहे. त्यावर संबंधित शेतकऱ्याने स्वाक्षरी करायची आहे.

अपात्रतेचे निकष

महापालिका, जिल्हा परिषद सदस्य, आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार, केंद्र, राज्य, निमशासकीय संस्था, अनुदानित संस्थांचे कर्मचारी, मूल्यवर्धित कर, सेवाकर कायद्यांतर्गत नोंदणीकृत आणि वार्षिक उलाढाल १० लाख रुपयांहून अधिक असलेली व्यक्ती, प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्ती यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

कर्जमाफी योजनेत अर्ज भरून घेण्यासाठी जिल्ह्य़ासाठी तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार एका दिवसात अकरा हजार अर्ज भरून होणे आवश्यक आहे. मात्र अर्ज भरून घेण्याचा वेग पाहता हा कालावधी कमी पडू शकतो. त्यामुळे आणखी वेळ  राज्य शासनाकडून मागून घेण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून अर्जामध्ये बँक खाते, आधार कार्ड आणि बायोमेट्रिकची संपूर्ण माहिती भरण्यात येणार असून ही माहिती तपासूनच संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे.

सौरभ राव, जिल्हाधिकारी