लेफ्टनंट जनरल एल. एन. सिंग यांचे मत

बदलत्या परिस्थितीमध्ये भारतीय लष्कराला सीमेवरील लढाई आणि घुसखोरी याच्याबरोबरीनेच दहशतवादी कारवायांशीही निकराने लढा द्यावा लागत आहे. त्यामुळे लष्कराच्या गुप्तचर विभागाचे महत्त्व आणखी वाढले आहे. या विभागाच्या कार्यपद्धतीमध्ये धोके वाढले असून पूर्वीच्या तुलनेत गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांना वीरमरण येण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्याचप्रमाणे गुप्तचर विभागाला मिळणाऱ्या पदकांच्या संख्येतही वाढ झाली आहे, अशी माहिती लष्कराच्या इंटेलिजन्स कोअरचे कर्नल कमांडंट आणि लेफ्टनंट जनरल एल. एन.सिंग यांनी गुरुवारी दिली.

इंटेलिजन्स कोअरच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सिंग बोलत होते. कोअरतर्फे मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अँड डेपोमध्ये निवृत्त अधिकारी, हुतात्मा जवान अधिकाऱ्यांचे कुटुंबीय यांच्या दोन दिवसांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी देशभरातून सेवानिवृत्त अधिकारी आणि कुटुंबीय आले आहेत. मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमधून २२ आठवडय़ांचे खडतर प्रशिक्षण संपवून ९८ सनिक गुरुवारी लष्करात दाखल झाले असून या कार्यक्रमात त्यांना शपथ देण्यात आली. त्यापूर्वी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

लेफ्टनंट जनरल एल. एन. सिंग म्हणाले, ‘लष्कराला पूर्वी फक्त केवळ सीमेवरच लढाई करावी लागत होती. आता मात्र, युद्धाचे स्वरूप बदलत आहे. गरजेनुसार परदेशासह संपूर्ण जम्मू काश्मीर, ईशान्य भारतासह अन्यत्रही लष्कराला कारवाई करावी लागत आहे. त्यासाठी आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम गुप्तचर विभाग करत असतो. बदलत्या परिस्थितीमुळे गुप्तचर विभागाचे काम गुंतागुंतीचे झाले आहे. विभागाच्या कामातील धोकेही वाढले आहेत. १९६२ च्या युद्धामध्ये गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आले होते. मात्र, सध्या गुप्तचर विभागाच्या कामातील धोके वाढले असल्याने गुप्तचर अधिकाऱ्यांच्या वीरमरणाचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या ७५ वर्षांत ३५ अधिकाऱ्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे.’

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या या मेळाव्याला पुण्यातील मेजर जनरल (निवृत्त) प्रमोद शेर्लेकर आवर्जून उपस्थित होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) दुसऱ्या तुकडीतील शेर्लेकर हे १९८५ ते १९९० या काळात मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अँड डेपोचे प्रमुखही होते. भविष्यातील धोके लक्षात घेऊन लष्कराचा गुप्तचर विभाग अधिक सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत शेर्लेकर यांनी व्यक्त केले. पूर्वी या विभागाला पुरेसा निधी मिळायचा नाही. त्याचप्रमाणे मनुष्यबळही अपुरे असेच होते. मात्र, आता परिस्थिती सुधारली आहे. त्या वेळी विविध रेजिमेंट्समध्ये जाऊन मिलिटरी इंटेलिजन्ससाठी सनिक आणि अधिकाऱ्यांची निवड केली जात असे, अशा आठवणींना शेर्लेकर यांनी उजाळा दिला.