पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे लष्कराचे व महापालिकेचे आवाहन;
दिघी-भोसरीमार्गे १५ किलोमीटर तर खडकी मार्गे १० किलोमीटरचा वळसा
बोपखेलवासीयांसाठी तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेला तरंगता पूल पावसाळय़ात काढून टाकण्यात येणार असल्याचे लष्कराने महापालिका प्रशासनाला कळवले आहे. त्यानुसार, सात जूनपासून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बोपखेल रहिवाशांना खडकी-संगमवाडी मार्गे नऊ ते दहा किलोमीटर तर दिघी-भोसरी मार्गे १५ किलोमीटरचा वळसा पडणार असल्याने महापालिकेचा उड्डाणपूल होईपर्यंत मोठय़ा प्रमाणात गैरसोय होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ पासून बोपखेल-दापोडीकरांचा वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आला. त्यानंतर, ग्रामस्थांनी आंदोलन करून या निर्णयाचा विरोध केला. त्यानंतर, बऱ्याच नाटय़मय घडामोडी झाल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांच्यापर्यंत प्रकरण गेले, तेव्हा ‘बोपखेल ते ५१२ खडकी’ हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला. नागरिकांच्या वहिवाटीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तरंगता पूल तयार करण्यात आला. दरम्यानच्या काळात याच ठिकाणी कायमस्वरूपी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय र्पीकरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये घेण्यात आला. त्यासाठी आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याचे आदेशही र्पीकरांनी लष्कराला दिले होते. त्यानुसार, पुलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तथापि, जूनमध्ये पावसाळा सुरू होणार असल्याने हा तरंगता पूल धोकादायक होऊ शकतो, असे कारण देत तो काढण्यात येणार असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे. लष्कराने याबाबतचे पत्र महापालिकेला दिले आहे. पालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण होण्यात बराच वेळ लागणार असल्याने व तात्पुरता पूल बंद करण्यात येणार असल्याने नागरिकांची पुन्हा एकदा मोठी गैरसोय होणार आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे प्रवक्ते विजय भोजणे यांनी केले आहे.

बोपखेलवासीयांसाठी पहिला पर्यायी मार्ग पुणे-आळंदी रस्त्यावरून संगमवाडी, खडकी, दापोडी असा राहणार असून ते अंतर नऊ ते दहा किलोमीटर आहे. दुसरा पर्यायी मार्ग पुणे-दिघी रस्त्यावरून भोसरी, नाशिकफाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी असा राहणार असून त्याचे अंतर १५ किलोमीटपर्यंत असेल. हे दोन्ही पर्यायी मार्ग नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहेत. पालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरू आहे. मान्यता कधी मिळणार, भूमिपूजन कधी होणार, प्रत्यक्ष काम सुरू होऊन ते पूर्ण कधी होणार, अशा अनेक शंका ग्रामस्थांच्या मनात आहेत. पूल तयार होईपर्यंत नागरिकांना पर्यायी मार्गावरून वळसा घालूनच गावात यावे-जावे लागणार आहे.