दिवाळीसाठी घरसजावटीपासून ते भेटी देण्यापर्यंत आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या पदार्थाचा अगदी दिवाळीच्या दिवशी लज्जत घेण्याचा आनंद देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘कुरिअर बॉय.’ ग्राहकांच्या खरेदीचे खोके घरोघरी पोहोचवत ग्राहकांच्या दिवाळीच्या उत्साहात कुरिअर बॉय आपली दिवाळी साजरी करत आहेत.

सणासुदीच्या दिवशीही सकाळी घराची बेल वाजते. आपण आतुरतेने वाट पाहात असलेला पाहुणा.. कुरिअर बॉय दारासमोर उभा असतो. त्याने आणून दिलेल्या आपल्या वस्तूंमुळे सणाचा उत्साह अधिकच वाढतो. यंदा ऑनलाईन खरेदी, परदेशी फराळ पाठवणे, ऑनलाईन फराळ, संकेतस्थळावरून खाद्यपदार्थाची खरेदी यांसाठी वाढलेल्या ग्राहकांच्या प्रतिसादामुळे यंदा पार्सल घरी पोहोचवणाऱ्या अनेक कुरियर बॉईजच्या दिवाळीच्या सुटय़ांमध्येही कपात झाली आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाबरोबरच ग्राहकांच्या आनंदात भर घालत त्यांची दिवाळी सुरू आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीच्या कालावधीत ऑनलाईन बाजारपेठेची उलाढाल दुपटीने वाढली. यंदा या कालावधीतील एकूण उलाढालीत ८० टक्के वाटा हा ऑनलाईन बाजारपेठेचा होता. विविध सवलती, योजना आणि वस्तू घरपोच मिळण्याची सुविधा यांमुळे ऑनलाईन खरेदी विक्री संकेतस्थळांना ग्राहकांचा प्रतिसाद यंदा मोठय़ा प्रमाणावर होता. त्यामुळे गेली काही वर्षे फराळ, भेटी, शुभेच्छापत्रे योग्य पत्त्यावर दिवाळीपूर्वी पोहोचवून कर्मचारी दिवाळीची सुटी घेत होते. मात्र आता रसदपुरवठा कंपन्यांवरील (लॉजिस्टिक्स) कामाचा ताण अधिक वाढला आहे. अनेक संकेतस्थळे एक किंवा दोन दिवसांत वस्तू घरपोच मिळण्याची हमी ग्राहकांना देतात. त्याचप्रमाणे वस्तूंच्या खरेदीबरोबरच खाद्यपदार्थ, मिठाई यांचीही ऑनलाईन खरेदी वाढली आहे. हे पदार्थ अगदी ठरलेल्या वेळेतच पोहोचवावे लागतात. त्यामुळे नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही हे कर्मचारी कार्यरत होते. या कंपन्यांना सर्वाधिक काम हे शहरी भागांत आहे. त्यामुळे अनेक जण आपापल्या मूळ गावापासून दूर शहरांत नोकरी करतात. यंदा सुटी न मिळाल्यामुळे अनेकांची दिवाळी ही आपापल्या कार्यालयातच झाली आहे.

अनुभव बरा आणि वाईटही

याबाबत रतन पांडे या कर्मचाऱ्याने सांगितले, ‘मी दरवर्षी दिवाळीसाठी उत्तरप्रदेशातील माझ्या घरी कुटुंबाबरोबर जात असे. यंदा मात्र सुटी मिळाली नाही. एरवी दिवसाला २० ते २५ पार्सल असतात. मात्र गेले काही दिवस ही संख्या दुप्पट झाली आहे. आम्ही सकाळी साडेसात वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंतही काम करतो आहोत.’ सांगली येथून पुण्यात आलेल्या तानाजी मोरे यांनी सांगितले, ‘दिवाळीच्या दिवशीही आम्ही तातडीची पार्सल पोहोचवत होतो. पार्सल मिळायला उशीर झाला की ग्राहकांकडून लगेच कंपनीकडे तक्रार केली जाते. काही ठिकाणी मात्र छान अनुभवही आला. पाषाण भागांत पार्सल पोहोचवायला गेलो होतो, तेथे एका आजींनी विचारपूस केली; आग्रहाने फराळही करायला लावला.’