प्रत्येकी ८ ते १० हजार रुपयांत बनलेल्या कृत्रिम पाणवठय़ांना सध्याच्या उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पसंती मिळते आहे. विशेषत: नान्नज आणि सुप्यात हे बघायला मिळत असून तेथील काळवीटे आणि चिंकारांना या पाणवठय़ांवर पाणी पिताना अधिक सुरक्षितता वाटत असल्याचे निरीक्षण वन अधिकाऱ्यांनी नोंदवले.
नान्नज व सुप्यासह भीमाशंकर, करमाळा व रेहेकुरी येथे वन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी दोन कमी खर्चिक कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. जानेवारी-फेब्रुवारीत बनवलेल्या या पाणवठय़ांचे वन्यप्राण्यांसाठीचे परिणाम आता कडक उन्हाळ्यात दिसू लागले आहेत. ५०० ‘जीएसएम’चा (ग्रॅम पर स्क्वेअर मीटर) प्लास्टिकचा कागद आणि बरोबरीने दगड व माती टाकून हे पाणवठे बांधले जातात आणि टँकरद्वारे दर ५ ते ६ दिवसांनी त्यात पाणी भरले जाते. प्रत्येक पाणवठय़ात अंदाजे दोन ते अडीच हजार लिटर पाणी साठवता येते.
नान्नजमध्ये सध्या काळवीट, लांडगा, खोकड आणि तरस यांच्यासाठी कमी खर्चिक पाणवठे उपयुक्त ठरत असून सध्या त्यांवर पक्षीही मोठय़ा प्रमाणावर येत असल्याची माहिती पुण्याचे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) शिवाजी फटांगरे यांनी दिली. ते म्हणाले, ‘वनांमधील नाले वा तलावांमध्ये सध्या खूप कमी पाणी शिल्लक असून ते तळाला गेले आहे. त्यामुळे पाणवठय़ाच्या कडेला चिखल असतो. वन्यप्राण्यांना अशा ठिकाणी चिखलात अडकण्याची भीती वाटते. या तुलनेत काळविटांसारख्या प्राण्यांना कृत्रिम पाणवठय़ांवर सुरक्षित वाटते. प्लास्टिकच्या कागदामुळे पाणवठय़ात चिखल होत नाही, शिवाय माती, मुरुम आणि दगड-गोटय़ांमुळे पाणीसाठा नैसर्गिक देखील वाटतो. हे पाणवठे प्राण्यांच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर असून नान्नजमध्ये काळविटांना आणि सुप्यात चिंकारांना त्यांचा फायदा दिसून आला आहे.’
या व्यतिरिक्त वनांमध्ये बशीच्या आकाराचे कृत्रिम पाणवठेही बांधले असून गंगेवाडी, नान्नज व रेहेकुरीत हे पाणवठे बोअर वेल व हातपंपाला जोडले आहेत. तसेच नान्नजजवळच्या नारडी गावात बोअर वेलला सौर पंप बसवून त्याद्वारे पाणवठय़ात पाणी पडेल अशी सोय केल्याची माहितीही फटांगरे यांनी दिली.