रंगमंच हेच आपले काम ही धारणा बाजूला ठेवून कलावंताने लिहिते होणे आवश्यक आहे. नाटकाच्या संहितेपासून ते प्रत्यक्ष सादरीकरणापर्यंत ज्या अनेक गोष्टी घडतात त्यादेखील कलाकाराच्या लेखणीतून आल्या तर, भावी पिढय़ांतील कलावंतांसाठी ते मार्गदर्शक ठरू शकेल, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी रविवारी व्यक्त केले.
गंधर्वभूषण जयराम शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त मराठी रंगभूमी संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात उत्कर्ष प्रकाशनच्यावतीने ‘सूर संगत’ या शिलेदार यांच्या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ नाटय़समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे, प्रकाशक सु. वा. जोशी, संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार आणि दीप्ती भोगले या वेळी उपस्थित होत्या.
भारतीय साहित्यामध्ये कलावंतांचे आत्मचरित्र अपवादात्मक असेच आहे. लेखकांनी कलावंतांची चरित्रे लिहिली आहेत. पण, स्वत:ला काय वाटते याविषयी कलावंत मोकळे होत नाहीत. ती उणीव जयराम शिलेदार यांनी या लेखनाद्वारे पूर्वीच दूर केली होती. नर्मविनोदासह शिलेदार यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व या पुस्तकात ठिकठिकाणी दिसते, असे सांगून जब्बार पटेल म्हणाले, शास्त्रीय संगीतामध्ये घराणे असते. त्याप्रमाणे नाटय़संगीतामध्ये मराठी रंगभूमी हे एक घराणे आहे. नाटय़पदांच्या गायनामध्ये नावीन्य आणताना गद्य-पद्य यातील संतुलन राखण्याचे कसब जयराम आणि जयमाला या शिलेदार दांपत्याकडे होते. चित्रपटाच्या स्पर्धेत संगीत नाटक जगविण्याचे काम तर त्यांनी केलेच. पण, ‘लोकशाहीर रामजोशी’, ‘जिवाचा सखा’ या माध्यमाद्वारे ते चित्रपटामध्येही यशस्वी झाले.
उत्तम गाणारा देखणा नट अशा शब्दांत शिलेदार यांचे वर्णन करीत बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांची रंगभूमीप्रतीची निष्ठा वाखाणण्याजोगी होती, असे सांगितले. राहुल सोलापूरकर यांच्यासह कीर्ती शिलेदार आणि दीप्ती भोगले यांनी पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन केले. उत्तरार्धात संस्थेच्या युवा कलाकारांनी ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग सादर केला.