ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांची खंत

केवळ सरकारच नव्हे, तर कलाप्रेमी जनतेच्या मनातदेखील कलाविश्वाबाबत नेमके धोरण नाही. त्यामुळेच, कला क्षेत्रात नेमके काय योगदान द्यायचे, आपले आयुष्य समृद्ध करण्यासाठी कलेचा कसा वापर करायचा, कलेमध्येच कारकिर्द कशी घडवायची अशा प्रश्नांबाबत संभ्रमावस्था आहे. परिणामी, कला क्षेत्राची खिचडी झाली आहे, अशी खंत ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांनी व्यक्त केली.

पुणे बिनाले या उपक्रमांतर्गत कोलते यांचे ‘चित्रकला, शिक्षण आणि आपण’ या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. सुजाता धारप यांनी कोलते यांच्याशी संवाद साधला.

कोलते म्हणाले की, कला नेमकी कशासाठी हेच आपल्याला ठाऊक नाही. माणसाच्या अभिव्यक्ती आणि भावविश्वाचा हुंकार कलेतून घडतो. मात्र, त्या विषयी आपण जागरूक नाही. कुटुंब आणि समाजव्यवस्थेमध्ये कलेविषयी अनास्था आहे. आपल्याकडील कलादालने ओस पडली असून कला ठेव्याला वाळली लागत आहे. तर, फ्रान्समध्ये कलाविष्कार पाहण्यासाठी रांगा लावल्या जातात. त्यामुळे तेथील समाज समृद्ध व प्रगल्भ आहे. आधुनिक काळामध्ये कलेचा अर्थार्जनाशी संदर्भ जोडला गेला. खरे तर आत्मानंदासाठी कला, हेच मुख्य सूत्र आहे. पण, त्याचा व्यावसायिक आविष्कार ब्रिटिशांनी शोधून काढला. त्यात गर काहीच नाही. पण, त्यामधील मूळ कलेच्या गाभ्याला धक्का लावणे मला पसंत नाही. कलेचे व्यावसायिकरण आणि कलेचा मांडलेला बाजार, यामधील तफावत आपण ओळखली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

कोलते म्हणाले, सर्व काही सरकारनेच करावे, अशा मानसिकतेमधून कला कधीच वृिद्धगत होणार नाही. कलेला राष्ट्रीय संपत्ती म्हणून आपण दर्जा देतो का, हा खरा प्रश्न आहे. केवळ फावल्या वेळचा उद्योग, म्हणून आपण कलेकडे पाहतो, याचा समाजाने गांभीर्याने विचार करावा लागेल. चंगळवादी संस्कृतीमध्ये चिरंतन आनंदानुभव घ्यायचा असेल, तर कलेच्या आश्रयाला जाण्याशिवाय पर्याय नाही.

कलेचीच भाषा आत्मसात करावी

कलेचे अध्ययन करताना ते कलेच्याच भाषेतून आत्मसात करणे आवश्यक आहे. तसेच, विचारदेखील कलेच्याच भाषेतून केला जाणे अपेक्षित आहे, असे सांगून प्रभाकर कोलते म्हणाले, प्रत्येक टप्प्यावर कलाविचारालाच प्राधान्य दिले पाहिजे. संगीत, शिल्पकलेसह इतरही इंद्रियांच्या माध्यमातून घेतला जाणारा रसास्वाद चित्रकलेशी कसा जोडता येईल, याचा विचार कलावंतांनी करणे गरजेचे आहे.