१० हजार रुपये काढण्याची सुविधा मोजक्याच ठिकाणी; बहुतांश एटीएम केंद्रे रोकड नसल्याने बंदच

‘एटीएम’मधून एका वेळेस दहा हजार रुपये काढण्याची मुभा सरकारने दिली असली तरी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच एटीएम केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध असल्याचे मंगळवारी ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले. केळकर रस्त्यावरील आणि कुमठेकर रस्त्यावर अजूनही पंचवीस टक्केच एटीएम केंद्रं सुरू असल्याचे या पाहणीत दिसले. बाजीराव रस्ता आणि सिंहगड रस्त्यावरही हीच परिस्थिती होती आणि पिंपरी-चिंचवडमध्येही एटीएम केंद्रांमध्ये मंगळवारी पैसे नव्हते.

पाचशे आणि एक हजाराची नोट चलनातून बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला बुधवारी (१८ जानेवारी) ७० दिवस पूर्ण होत आहेत. बँकेच्या शाखांमधून पैसे काढता येत असले तरी एटीएम केंद्रातून अद्यापही पैसे मिळत नाहीत हे शहरातील वास्तव आहे. बहुतांश बँकांची काही ठराविक एटीएम केंद्र सुरू असून त्यामध्ये पैसे भरल्यानंतर अवघ्या दीड-दोन तासात ते संपतात. त्यामुळे उशिराने एटीएम केंद्रामध्ये जाणाऱ्या नागरिकांना पैशांअभावी परतावे लागत आहे.  ‘एटीएम’मधून सोमवापर्यंत (एकावेळी केवळ साडेचार हजार रुपये काढता येत होते. त्यामध्ये वाढ करून आता एकावेळी दहा हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, ही रक्कम आठवडय़ामध्ये २४ हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये, असेही नमूद केले आहे. ज्या बँकेची शाखा आणि एटीएम शेजारी आहे त्या ठिकाणी एटीएम केंद्र बंद असल्याचे ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.

केळकर रस्त्यावरील एटीएम केंद्राची स्थिती

(बँकेचे नाव, स्थळ आणि परिस्थिती)

’ पाहणीची वेळ सकाळी अकरा ते बारा ’ एचडीएफसी बँक (रतन चित्रपटगृहाजवळ) एटीएम केंद्र बंद होते आणि शटर निम्म्यावर होते. ’ एनकेजीएसबी बँक (अप्पा बळवंत चौक) एटीएम केंद्र बंद होते. ’  एचडीएफसी बँक (मंदार लॉजसमोर) एटीएम केंद्र बंद होते. ’  एचडीएफसी बँक (रमणबाग शाळेजवळ) एटीएम केंद्र बंद होते.  ’  जनता सहकारी बँक (रमणबाग शाळा) एटीएम केंद्र सुरू होते.  ’ आयसीआयसीआय बँक (रमणबाग शाळेजवळ) एटीएम केंद्र सुरू होते. तरी पैसे निघाले नाहीत. ’  बँक ऑफ महाराष्ट्र (केसरीवाडा) एटीएम केंद्र सुरू असले तरी एटीएममध्ये पैसे नव्हते.’  इंडसइंड बँक (नारायण पेठ पोलीस चौकीजवळ) एटीएम केंद्र सुरू असले तरी पैसे निघाले नाहीत. ’  नगर सहकारी बँक (नारायण पेठ पोलीस चौकीजवळ) एटीएम केंद्र सुरू होते. मात्र, साडेचार हजार रुपयेच निघत होते.  ’  बँक ऑफ इंडिया (नारायण पेठ पोलीस चौकीजवळ) एटीएम केंद्र सुरू असले तरी त्यामध्ये पैसे नव्हते.

कुमठेकर रस्ता

* आयडीबीआय बँक (चित्रशाळा चौक) एटीएम केंद्र सुरू होते. त्यामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या.

* एचडीएफसी बँक (उंबऱ्या गणपती चौकाजवळ) पैसे नसल्याने एटीएम केंद्र बंद होते.

* स्टेट बँक ऑफ इंडिया (शिवसंतोष दुग्धालयासमोर) पैशांअभावी एटीएम केंद्र बंद होते.

*  कोटक महिंद्रा बँक (शिवसंतोष दुग्धालयाशेजारी) एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या आणि दहा हजार रुपये काढता येत होते.