राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याची केरळमध्ये हत्या झाल्याच्या घटनेचे पडसाद मंगळवारी पुण्यात उमटले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीएम) आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) यांच्या नारायण पेठेतील कार्यालयात घुसून आठ ते दहा जणांनी दुपारी तोडफोड केली. कार्यालयातील कागदपत्रांवर ऑईल ओतण्यात आले. हा हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप सीपीएमचे अजित अभ्यंकर यांनी केला. दरम्यान, या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
केरळमध्ये संघाचे नेते मनोज यांची सोमवारी हत्या झाली होती. त्या घटनेनंतर पुण्यात सीपीएम आणि सीटूच्या कार्यालयावर हल्ला झाला आहे. याबाबत सीपीएमचे सतीश चव्हाण यांनी सांगितले, ‘नारायण पेठेतील सीपीएम व सीटूच्या कार्यालयात दुपारी दोनच्या सुमारास आठ ते दहाजण घुसले. त्यावेळी कार्यालयात मी आणि सीटूचे थॉमस वर्गीस होतो. आतमध्ये घुसलेल्या एका व्यक्तीने ‘केरळमध्ये आरएसएसच्या नेत्याची करण्यात आलेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी आलो आहोत’ असे म्हणत टेबलवरील काच ओढून फोडली. दुसरी एक व्यक्ती हिंदीमध्ये हेच मोठय़ाने ओरडत होती. आणखी एक व्यक्ती पुढे आली त्याने कार्यालयात सर्वत्र ऑईल ओतण्यास सुरुवात केली. कागदपत्रे, फाईल यावर ऑईल ओतले. आग लावतील या भीतीने आम्ही आतमध्ये गेलो. तोपर्यंत  कार्यालयाच्या खाली आरडा-ओरडा सुरू झाला होता. काही वेळात कार्यालयात घुसलेल्या व्यक्ती निघून गेल्या.’
उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी सांगितले की, हा हल्ला उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींनी केल्याची तक्रार सीपीएमच्या वतीने देण्यात आली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे काम सुरू आहे. सर्व बाजू तपासून संबंधितांवर कारवाई केली जाईल. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
 
‘‘चार वर्षांपूर्वी केरळमध्ये एका व्यक्तीची हत्या झाली होती. त्यावेळीही सीपीएमच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर हिंदुत्ववादी संघटनांचे हे काम आहे.’’
– अजित अभ्यंकर (सीपीएम)
 
‘‘संघाचा कोणत्याही प्रकारच्या हिंसेवर विश्वास नाही. या हल्ल्याचा संघ निषेध करीत आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास करून सत्य बाहेर आणावे.’’
– कैलास सोनटक्के (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगरचे कार्यवाह)