दारू पिण्यास पैसे देण्यास नकार देणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या चौघांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तळजाई वसाहतीत शनिवारी रात्री ही घटना घडली. रहिवाशांना धमकावून आरोपी पसार झाले.
सचिन तुपसौंदर (वय २६ )असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
धीरज आरडे, राजू लोंढे, ॠषीकेश लोंढे, अतिश आरडे (सर्व रा. तळजाई वसाहत, सहकारनगर ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण पसार झाले आहेत.
सचिन तुपसौंदर शनिवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घरी टीव्ही पाहात होता. त्यावेळी आरोपी त्याच्या घरात शिरले आणि त्यांनी त्याच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले. सचिन याने नकार दिला. आरोपी धीरज, राजू, ॠषीकेश, अतिश याने सचिनला घराबाहेर ओढत नेले. त्याला बांबूने मारहाण क रून डोक्यात कोयत्याने वार केला. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. पाटील तपास करत आहेत.