माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, भारतीय छात्र संसद फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या भारतीय छात्र संसदेचे उद्धाटन नोबेल पारितोषिक विजेत्या व म्यानमारच्या विरोधी पक्षनेत्या आँन सान स्यू की, पाकिस्तानातील महिला व बालकल्याण कार्यकर्त्यां मलाला युसूफझाई यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक राहुल कराड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
छात्र संसदेत यावर्षी २८ राज्यातील सुमारे १० ते १२ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन १० जानेवारीला होणार आहे. उद्घाटन समारंभाला युवक कल्याण व क्रीडा विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्रसिंह, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी, संयुक्त राष्ट्र संघाचे युवक प्रतिनिधी अहमद अलहिंदवी, रामचरितमानसचे भाष्यकार मुरारी बापू, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, आंतरराष्ट्रीय ट्रप शूटर रंजन सोदी, पर्यावरणवादी कार्यकर्त्यां सुनीता नरेन, अभिनेता डॅनिअल रॅडक्लिफ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी ८ सत्रे होणार आहेत.  सीता, द्रौपदी ते निर्भया, राजकीय नेतृत्व- भारतीय तरुणाला काय हवे, चंगळवाद भारताला गिळंकृत करीत आहे का, पैसा आणि राजकारण : लोकशाही विकणे आहे का, चित्रपट, संगीत आणि क्रीडा- भारताला एकत्र आणणारी प्रेरणा, सृजनशील शिक्षण : युवकांचा शक्तिस्त्रोत, विद्यार्थ्यांचा आवाज-एक सवाल सौ जबाब, ‘विकासाद्वारे नक्षलवादास उत्तर’ या विषयांवर चर्चा होणार आहेत.