नाशिक फाटा, निगडी, आकुर्डी, रहाटणी, कोकणे चौक या द्रुतगती वर्तुळाकार मार्गावरील अतिक्रमणे काढून टाकण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी नऊपासून सुरु केलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईमध्ये काळेवाडी फाटय़ाजवळील २५ हजार चौरसफूट जागेवरील अतिक्रमणे प्राधिकरणाने भुईसपाट केली. यामध्ये निवासी इमारती तसेच व्यावसायिक गाळ्यांचा समावेश आहे.

नाशिक फाटय़ापासून सुरु होणारा द्रुतगती वर्तुळाकार मार्ग निगडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, रहाटणी, कोकणे चौक येथून पुढे नाशिक फाटय़ाला मिळतो. या मार्गावर झालेली अतिक्रमणे काढण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार काळेवाडी फाटय़ाजवळ ४०० मीटर अंतरावरील पक्क्य़ा इमारती, गोदामे, व्यावसायिक गाळे आदी अतिक्रमणे प्राधिकरणाने काढून टाकली. या मार्गावरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे. शिवराजनगर येथील अतिक्रमणे दोन दिवसांनी काढण्यात येणार असल्याचे क्षेत्रीय अधिकारी वसंत नाईक यांनी सांगितले.

प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव, क्षेत्रीय अधिकारी वसंत नाईक आणि प्राधिकरणाच्या अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तीन पोकलेन, दोन जेसीबी यंत्रांचा वापर कारवाईसाठी करण्यात आला. वाकड पोलीस ठाण्याचे शंभर पोलीस कर्मचारी कारवाईसाठी नेमण्यात आले होते.