शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ व्यंगचित्रकाराला त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊ, असे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी चिंचवड येथे सांगितले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी आपल्या भाषणात ही सूचना केली होती, त्याचा संदर्भ देत मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याची निश्चितपणे अंमलबजावणी करू, अशी ग्वाही शिवतारेंनी दिली.
जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ यांच्या ‘उद्धव श्री’ पुरस्कारांचे वितरण शिवतारे तसेच संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. माजी मंत्री शशिकांत सुतार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे आदी उपस्थित होते. बाबा कल्याणी, मंगेश तेंडुलकर, भाऊ कदम, रसिका वझे, महेश मोतेवार, अजय शिर्के, मनोहर जांभेकर, निरंजन किलरेस्कर, जनक शाह, गोपीचंद चाटे, डॉ. रवींद्र कोलते, अरुण निगवेकर, प्रवीण तुपे, संदीप जोशी आदींचा पुरस्कार्थीमध्ये समावेश होता. शिवतारे म्हणाले, मोदी लाट असतानाही एकाकी लढा देत उद्धव ठाकरे यांनी सेनेची ताकद दाखवली. मानसिक बळ आणि इच्छाशक्ती असल्यास काय होते, ते त्यांनी दाखवून दिले. राजकारणात तीन पवार, तीन राणे, तीन भुजबळ आणि तीन नाईक आहेत. बापाची पेंड असल्यासारखे वर्षांनुवर्षे ते सत्ता बळकावून बसले आहेत. दुसरीकडे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठमोठी पदे देणारे ठाकरे कुटुंबीय आहे. डॉ. कोल्हे म्हणाले, राजकारणात नीतिमत्ता जपणारा आणि विश्वासार्ह चेहरा म्हणून उद्धव यांच्याकडे पाहिले जाते. बारणे, चाबुकस्वार यांचेही भाषण झाले. धुमाळांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले.

भाऊ कदमचाच ‘भाव’
हास्य अभिनेते भाऊ कदम पुरस्कार सोहळ्याचे आकर्षण होते. त्यांचा नामोल्लेख होताच टाळ्या-शिट्टय़ांचा कडकडाट होत होता. लिखित संवादाशिवाय बोलता येत नसल्याची अडचण सांगतानाच मनोगतात त्यांनी ‘करून गेला गाव’ नाटकातील प्रसंग सादर करून धमाल उडवली. सहकारी अमोल कोल्हे यांची भाषणशैली प्रभावी झाल्याचे सांगून तो उद्याचा मोठा नेता आहे, असे प्रशस्तिपत्रही दिले.